भारतीय राजकारणातील चर्चित चेहरा असणारे राज्यसभा सदस्य अमर सिंह यांनी बुधवारी आपली वडिलोपार्जित जमीन आणि घर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) निगडीत राष्ट्रीय सेवा भारतीला दान केली आहे. अमर सिंह यांची संपत्ती आझमगड येथील लालगंज तहसीलमधील तरवां परिसरात आहे. लालगंज तहसीलचे उपनिबंधक सुनीलकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार अमर सिंह यांच्या या संपत्तीचे सरकारी मुल्यांकन हे २ कोटी ९१ लाख ५५ हजार रूपये आहे. वडिलांच्या स्मृतीपित्यर्थ समर्पित करत असल्याचे अमर सिंह यांनी म्हटले आहे.
दान केलेल्या संपत्तीत शेत जमीन आणि घराचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर अमर सिंह यांच्या या घरात बुलेटप्रूफ खिडकी आणि लिफ्ट ही आहे. संपत्तीची नोंदणी करताना राष्ट्रीय सेवा भारतीचे राष्ट्रीय महामंत्री ऋषिपाल सिंह आणि खजिनदार मुकेशकुमार शर्मा आणि अमर सिंह उपस्थित होते. अमर सिंह यांनी दान केलेल्या संपत्तीवर सेवा भारती ठाकूर हरिश्चंद्र सेवा केंद्राची स्थापना केली जाणार असल्याचे आरएसएसचे राष्ट्रीय संघटन मंत्री ऋषिपाल सिंह ददवाल यांनी सांगितले.
आझमगडची जमीन ही मौलाना शिबली, राहुल सांकृत्यायन आणि कैफी आझमी यांच्यासारख्या थोर लोकांची आहे. पण आता येथे धर्म आणि घाणेरडे राजकारण केले जात असल्याची टीका अमर सिंह यांनी यावेळी केली.
प्रियंका गांधी या मेहनती असल्या तरी दिल्ली त्यांच्यासाठी सोपी नसल्याचेही अमर सिंह यांनी म्हटले. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललेल्या पावलांचे त्यांनी कौतुक केले. पूर्वी लष्कराला गोळ्या झाडण्यासाठी आदेश द्यावे लागत असत. पण मोदी सरकारने लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याचे ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2019 10:32 am