मराठा समाजाच्या मोर्चाना विरोध नाहीच : आठवले

‘कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ महाराष्ट्रात ठिकठिकाणी निघत असलेल्या मराठा समाजाच्या मोर्चाना आमचा विरोध नाही. दलित अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायदा रद्द करण्याची त्यांची मागणी आहे, तर त्यास धक्का न लावण्याची आमची मागणी आहे. मोर्चे काढण्याचा, मागणी करण्याचा त्यांना जसा हक्क आहे, तसा आम्हालाही आहे. शांततेत मोर्चे काढल्याबद्दल मराठा समाजाचे मी हार्दिक अभिनंदन करतो. आम्हीसुद्धा शांततेत मोर्चे काढू. वातावरण न बिघडण्याची काळजी घेऊ.. (पण) आम्ही जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो.. अशा विचारांची माणसे आहोत’, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी याबाबतची भूमिका मांडली.

कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ निघत असलेल्या मराठा समाजाच्या मोर्चामध्ये दलित अत्याचारप्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटीज अ‍ॅक्ट) रद्द करण्याची मागणी होऊ  लागल्याने दलितांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातून अ‍ॅट्रॉसिटीज कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्याचे घाटत आहे. मात्र, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी असे प्रतिमोर्चे काढण्यास विरोध केला आहे. त्यावर आठवले यांनी वरील भूमिका मांडली. ‘लाखोंच्या संख्येने जिल्हावार निघत असलेल्या मराठा समाजाच्या मोर्चानी खेडय़ापाडय़ातील दलितांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पण दलितांना माझे एकच सांगणे आहे, की अजिबात घाबरू नका. सरकार आणि पोलीस आपलेच आहेत’, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

‘हातची सत्ता गेल्यामुळे प्रस्थापित मराठा समाज सैरभैर झाला आहे. दलितांच्या मदतीनेच सत्ता मिळाल्याचा विसर मराठा नेतृत्वाला पडता कामा नये. म्हणून दलितांचे सहकार्य नसल्याने लाखोंचे कितीही मोर्चे काढले तरी मराठा समाजाला पुढची पाच वर्षे तरी सत्ता मिळणार नाही. सन २०१९मधीलही निवडणूक आम्हीच जिंकू’, असे ते म्हणाले. ‘कितीही मोर्चे काढले तरी अ‍ॅट्रॉसिटीज कायदा रद्द होणार नाही. त्याचा गैरवापर टाळण्यासाठी त्यांत काही बदल करण्याची सरकारची जरूर तयारी आहे. पण मुळात जर दलितांवर अत्याचारच केले नाहीत तर या कायद्याचा वापर-गैरवापर होण्याची वेळच येणार नाही. म्हणून अत्याचार होऊ  नयेत, यासाठी मराठा समाजाने मोर्चे काढले पाहिजेत’, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली.  त्याचबरोबर, ‘गावांमध्ये राहायचे असल्याने दलितांनीही विनाकारण संघर्ष करू नये. मराठा-दलित युती राज्याच्या राजकारण व समाजकारणासाठी महत्त्वाची आहे, अशी जोडही त्यांनी आपल्या वक्तव्यास दिली.

प्रकाश आंबेडकरांचा समाचार

मराठय़ांच्या विरोधात प्रतिमोर्चे काढण्यासाठी संघ व भाजप दलितांना भरीस घालत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्याचा समाचार आठवलेंनी घेतला. ‘हा खोडसाळ आरोप आहे. रिपब्लिकनांची व दलितांची मोठी ताकद असताना मोर्चासाठी संघ किंवा अन्य कोणाच्या आश्रयाला जाण्याची गरज नाही. कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार प्रतिमोर्चे काढू,’ असा टोला त्यांनी हाणला.

जातीय अत्याचाराविरोधात दिल्लीत उद्या संघर्ष मोर्चा

देशभरात दलित व अल्पसंख्याकांवर होत असलेल्या जातीय अत्याचाराच्या विरोधात डाव्या-आंबेडकरवादी पक्ष-संघटनांच्या वतीने शुक्रवारी १६ सप्टेंबरला दिल्लीत संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, सुधाकर रेड्डी, वृंदा कारत, रोहित वेमुलाची आई राधा वेमुला, उना दलित अत्याचार विरोधी समितीचे नेते जिग्नेश मेवाणी आदी नेते या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.

महाराष्ट्रात निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाना विरोध करण्यासाठी प्रतिमोर्चे काढू नका, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. मात्र, त्यांच्याच नेतृत्वाखाली देशभरातील दलित अत्याचाराविरोधात दिल्लीत निदर्शने, मोर्चा व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी भाकप, मापक, भारिप-बहुजन महासंघ व अन्य पुरोगामी संघटनांचा सहभाग असलेल्या राष्ट्रीय स्तरावर दलित स्वाभिमान संघर्ष मंचाची स्थापना करण्यात आली आहे.