संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावर मौन बाळगल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसने कोंडीत पकडले होते. मोदींवर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली होती. पण मोदींनी आता जागतिक मंचावरुन काँग्रेससह विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. महिलांविरोधातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक बाब असल्याचे मोदींनी मान्य केले पण त्याचवेळी कोणी या घटनांचे राजकारण करु नये असे त्यांनी म्हटले आहे.

लंडनमधल्या ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये ‘भारत की बात, सबके साथ’ या कार्यक्रमात ते बोलत होते. कोणाच्या सरकारमध्ये बलात्काराच्या किती घटना घडल्या त्याची तुलना करणे चुकीचे आहे. हा एक संवेदनशील आणि गंभीर विषय आहे असे मोदी म्हणाले. महिलांविरोधातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय आहे. बलात्कार हा बलात्कार असतो. त्याचे कोणी राजकारण करु नये असे मोदी म्हणाले.

कुठल्याही छोटया मुलीवर बलात्कार होतो तेव्हा ती वेदनादायी घटना असते. तुमच्या सरकारमध्ये इतके बलात्कार झाले, माझ्या सरकारमध्ये इतके बलात्कार होतात असे आपण म्हणू का? बलात्कार हा बलात्कार असतो. एका मुलीबरोबर अत्याचार आपण कसा सहन करु शकतो ? असे मोदी म्हणाले. मुलींना आदराने वागवायचे असते हे मुलांना शिकवण्याची गरज आहे.

जो पाप करतोय तो कोणाचा तरी मुलगाच असतो. त्यामुळेच लाल किल्ल्यावरुन मी हा विषय नव्या पद्धतीने मांडला होता. मुलगी उशिरा घरी आली तर उशीर का झाला ? कुठे गेली होतीस ? कोणाला भेटलीस ? असे प्रश्न विचारतात. पण हेच प्रश्न मुलगा जेव्हा घरी उशीरा येतो तेव्हा त्याला सुद्धा विचारा असे मोदी म्हणाले.