वादग्रस्त लेखिका तस्लिमा नासरीन यांचं एक ट्विट सध्या चर्चेत आहे. हे ट्विट त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर आहे. त्यांनी एका मुस्लीम टॅक्सी ड्रायव्हरसोबतचा संवाद ट्विटरवर पोस्ट केला आहे. उबरच्या टॅक्सी चालकासोबतचा हा संवाद आहे. नुकतीच झारखंडच्या रांची या ठिकाणी एका तरूणाला चोरीच्या संशयावरून माराहण करण्यात आली. त्याला जय श्रीरामच्या घोषणा देण्याची सक्ती केली होती असा आरोप झाला. तसेच ठाण्यातील मुंब्रा भागात एका टॅक्सीचालकाला मारहाण झाली. या टॅक्सी चालकानेही आपल्याला मारहाण करणाऱ्या तिघांनी जय श्रीरामचे नारे देण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. तस्लिमा नासरीन यांनी याच संदर्भात टॅक्सी चालकाशी संवाद साधला आहे.

काय आहे हा संवाद?

तस्लिमा नासरीन-तुझे नाव काय?
उबर चालक-ताहिर खान
तस्लिमा नासरीन-तू कुठे राहतोस?
उबर चालक– ओखला
तस्लिमा नासरीन– तुला आत्तापर्यंत एकाने तरी जय श्रीराम म्हणायची सक्ती केली?
उबर चालक– कधीच नाही
तस्लिमा नासरीन-तुला मुस्लीम म्हणून देशात सुरक्षित वाटते का?
उबर चालक– हो
तस्लिमा नासरीन-आत्तापर्यंत तुला एखाद्या वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं का?
उबर चालक– नाही
तस्लिमा नासरीन– तू कुणाला मत दिलं?
उबर चालक-मोदींना
तस्लिमा नासरीन-तुला घरासाठी निधी मिळाला का?
उबर चालक-होय, ३ लाख रूपये मिळाले

लेखिका तस्लिमा नासरीन यांनी हा संवाद त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. जे मारहाण झाल्यावर आपल्याला जय श्रीरामचे नारे देण्याची सक्ती केली गेली असा आरोप करतात त्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न या ट्विटमधून तस्लिमा नसरीन यांनी केला आहे.

कोण आहेत तस्लिमा नासरीन?

तस्लिमा नासरीन या वादग्रस्त बांगलादेशी लेखिका आहेत. ‘लज्जा’, फेरा, बेशरम या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या आहेत. त्यांनी मुस्लीम समाजातील अनिष्ट प्रथांवर ताशेरे झाडल्याने त्यांना बांगलादेशातून बहिष्कृत करण्यात आले. त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या फतव्यामुळे त्यांना बांगलादेश सोडावा लागला. मात्र भारताविषयी त्यांच्या मनात आदर आणि प्रेम आहे. भारताने त्यांना आश्रयही दिला आहे.