भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आले असून यावेळी ते सिलिकॉन व्हॅलीला भेट देणार आहेत. सिलिकॉन व्हॅली येथे ते अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि तेसला या तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. यावेळी नवनिर्मिती, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि ऊर्जेचे नवनिर्माण या मुद्दय़ांवरच पंतप्रधान मोदी यांचा भर असेल.
२६ सप्टेंबर रोजी सिलिकॉन व्हॅलीतील पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी तेसला या वाहन उद्योगातील प्रभावशाली कंपनीला भेट देणार असून यावेळी तेसला कंपनीचे मुख्य कार्यकारी प्रमुख इलोन मस्क हे त्यांचे स्वागत करतील. यावेळी पंतप्रधान मोदी नवनिर्मिती आणि ऊर्जेच्या नवनिर्मितीबाबत चर्चा करतील, अशी अपेक्षा आहे. तेलसा कंपनीला बॅटरी तंत्रज्ञानामध्ये रुची असल्याने पंतप्रधान मोदी यांच्याशी ऊर्जेच्या नवनिर्मितीच्या मर्यादेबाबत चर्चा करतील, असे भारतीय राजदूत अरुण सिंग यांनी सांगितले. त्यानंतर मोदी अ‍ॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांची भेट घेऊन तंत्रज्ञानाबाबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सत्या नादेला, गुगलचे सुंदर पिचई, सिस्कोचे जॉन चेम्बर, क्वालकॉमचे कार्यकारी प्रमुख पॉल जेकब आणि अ‍ॅडोबचे शंतनु नारायण हे डिजिटल तंत्रज्ञानाबाबत सादरीकरण करणार आहेत. या सादरीकरणामध्ये भारतासाठी डिजीटल अर्थव्यवस्था यावर भर देण्यात येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे भारत-अमेरिका सहकार्यातून भारतासाठीच्या योजनाही यामध्ये मांडल्या जातील. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी ‘डिजिटल इंडिया’ या धोरणाबाबत चर्चा करतील. या भेटीमुळे भारत-अमेरिका सहकार्यातील नव्या पर्वाला सुरुवात झाल्याचे मत अरुण सिंग यांनी व्यक्त केले. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या ऊर्जा विभागाने ऊर्जेची नवनिर्मिती या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन केले आहे.
अमेरिका दौऱ्यात विविध आंतरराष्ट्रीय मुद्दय़ावर चर्चा करायची आहे. यामध्ये आर्थिक आणि सामाजिक विषयांचा समावेश असेल अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेला रवाना होण्याआधी दिली. गुगल या कंपनीच्या भेटीदरम्यान गुगल भारताला तांत्रिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण बनविण्यात कशी उपयुक्त ठरेल याबाबत मोदी चर्चा करणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विकास स्वरूप यांनी दिली.

सुंदर पिचई यांचा ‘डिजिटल इंडिया’ला पाठिंबा

भारतीय वंशाचे गुगलचे मुख्य कार्यकारी प्रमुख सुंदर पिचई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या मोहिमेला पाठिंबा जाहीर केला आहे. या मोहिमेनुसार भारतातील कोटय़वधी जनतेला जोडता येईल, असे पिचई म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे गुगलमधील माझ्या सर्व सहकाऱ्यांना अत्यंत आनंद झाला असून मोदींशी चर्चा करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्ही नरेंद्र मोदी यांचे सिलिकॉन व्हॅलीत स्वागत करतो. मोदी यांचे स्वागत करणे हा क्षण आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. डिजिटल इंडिया या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील लोकही ऑन लाइन राहू शकतील. फोनमुळेही लोकांना जोडले जाणे शक्य आहे, असे मत पिचई यांनी व्यक्त केले.