हिंसाचाराच्या घटनांमुळे निर्णय; जम्मूमध्ये काही जिल्ह्य़ांतील इंटरनेट सेवा पुन्हा बंद

जम्मू काश्मीरमध्ये शनिवारी सायंकाळी अनेक ठिकाणी युवक आणि सुरक्षा जवान यांच्यात चकमकी झडल्यानंतर रविवारी काही ठिकाणी पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले.

काही भागांतील निर्बंध उठवण्यात आले होते, परंतु शनिवारी हिंसाचाराच्या घटना घडल्यामुळे ते पुन्हा लागू करण्यात आले. खोऱ्यात सुमारे १२ ठिकाणी निदर्शकांनी आंदोलन केले. त्यात काही जण जखमी झाले असून त्यांची संख्या समजू शकली नाही, असे सूत्रांनी सांगितले. परंतु सरकारी प्रवक्ते रोहित कन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार काश्मीर खोऱ्यात शनिवारी सायंकाळी सहा ठिकाणी हिंसक निदर्शने झाली. त्यात आठ जण जखमी झाले.

दरम्यान जम्मू काश्मीरच्या अनेक भागांत रविवारी लागोपाठ चौदाव्या दिवशी कडक निर्बंध लागू होते. सुमारे ३०० हज यात्रेकरू रविवारी सकाळी श्रीनगर विमानतळावर उतरले. त्यांना घ्यायला आलेल्या त्यांच्या कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला विमानतळावर सोडण्यात येत होते. यात्रेकरूंना नेण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसची सेवा उपलब्ध करून देण्यात आली. यात्रेकरू  आणि त्यांच्या नातेवाईकांना पास देण्यात आले होते, असे सरकारी प्रवक्ते कन्सल यांनी सांगितले.

पस्तीस पोलीस ठाण्यांच्या हद्दीत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तथापि, युवक आणि सुरक्षा दले यांच्यात चकमकी झडल्यानंतर ते पुन्हा लागू करण्यात आले, असेही कन्सल यांनी स्पष्ट केले.

श्रीनगरच्या अनेक भागांतील दूरध्वनी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असून अन्य भागांतील सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काश्मीर खोऱ्यातील आणखी ५० पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु श्रीनगरच्या काही भागांत हिंसाचार घडल्यानंतर जम्मूच्या पाच जिल्ह्य़ांतील इंटरनेट सेवा पुन्हा बंद करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक आदेश हळूहळू शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू असून शनिवारी ३५ तर रविवारी ५० पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील निर्बंध हटवण्यात आल्याचे कन्सल यांनी स्पष्ट केले. सोमवारपासून सुरू होणाऱ्या नव्या आठवडय़ाकडून आम्हाला नवी आशा आहे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. सोमवारपासून श्रीनगरमधील १९० प्राथमिक शाळा पुन्हा सुरू होत आहेत, असेही कन्सल यांनी सांगितले.

केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा

पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करीत नाही आणि दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत त्या देशाशी चर्चा केली जाणार नाही, परंतु चर्चेची वेळ आलीच तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्दय़ावरच केली जाईल, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले.

राजनाथ म्हणाले, ‘‘काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तान सैरभैर झाला असून अन्य देशांची दारे ठोठावून मदतीची याचना करीत आहे. त्यांनी आम्हाला धमकावलेही आहे, पण आम्ही काही गुन्हा केला आहे का? जगातील शक्तिशाली देश समजल्या जाणाऱ्या अमेरिकेने पाकिस्तानला खडसावून भारताशी संवाद सुरू करण्यास सांगितले आहे; परंतु पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई केल्याशिवाय चर्चा होणार नाही आणि झालीच तर ती फक्त पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्दय़ावर होईल.’’

मोदींच्या हाती अण्वस्त्रे सुरक्षित आहेत का?- इम्रान

अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याचे धोरण भारत कायम ठेवीलच असे नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बिथरले आहेत. भारतामधील हुकूमशहा, हिंदू वर्चस्ववादी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या हाती अण्वस्त्रे सुरक्षित आहेत का, याची आंतरराष्ट्रीय समुदायाने नोंद घ्यावी, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. भारताच्या अण्वस्त्रांच्या सुरक्षेचा मुद्दा गांभीर्याने घेण्याची गरज असून त्यामुळे प्रादेशिक शांतता धोक्यात येण्याची आणि जागतिक शांततेलाही धक्का बसण्याची शक्यता आहे, असे ट्वीट इम्रान यांनी केले आहे.