जगातील अन्नाच्या टंचाईमुळे अनेक लोक कुपोषणाला बळी पडतात त्यावर उपाय म्हणून संशोधकांनी उच्च प्रतीच्या तांदळाच्या पिठाचा उपाय शोधून काढला आहे. तांदळाच्या या पिठात प्रथिने आहेत व ते खास तयार केलेले पीठ आहे. या पिठापासून गव्हाच्या ब्रेडप्रमाणे तांदळाचा ब्रेड तयार करता येतो. साधारण तांदळापेक्षा जास्त पोषणमूल्ये तांदळाच्या या पिठात आहेत. त्यासाठी तांदळाच्या नव्या प्रथिनयुक्त प्रजातीचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे.
तांदळाचे हे पीठ गव्हाच्या पिठाला पर्याय आहे व त्यामुळे गव्हाची अ‍ॅलर्जी असलेल्यांनाही फायदा होणार आहे. जगातील अन्नधान्य टंचाईमुळे लोकांचे कुपोषण होते त्यावरही यामुळे उपाय शक्य आहे, असे यामागाटा विद्यापीठाचे डॉ. याओई ओंडा यांनी सांगितले.
गव्हाच्या पिठाप्रमाणे तांदळाच्या पिठाचा ब्रेड तयार करता येत नाही, पण या तांदळाच्या पिठाचा ब्रेड तयार करता येईल असे त्याचे गुणधर्म आहेत, असे फिजिक्स डॉट ओआरजी या संकेतस्थळाने म्हटले आहे. वैज्ञानिकांना तांदळाच्या पिठात विशिष्ट प्रथिन कमी आढळून आले, त्याचे नाव पीडीआयएल१, १ असे आहे. ते बीजधारणेच्या वेळीच तयार होत असते. नंतर त्यांनी या तांदळात हे प्रथिन जास्त प्रमाणात आणून त्याच्या पिठापासून ब्रेड करता येईल असे गुण निर्माण केले. ब्रेड करण्यासाठी पिठात डायसल्फाइडचे बंध आवश्यक असतात, ते प्रथिनांना जोडण्याचे काम करतात. त्यामुळे तांदळाच्या पिठाचा पौष्टिक दर्जा सुधारतानाच त्याचा ब्रेड तयार करता येतो. तांदळाच्या नवीन प्रकारच्या या पिठाचे ब्रेड करताना ते आंबवावे लागते त्यावेळी त्यात बुडबुडे तयार होतात त्यामुळे पिठातील बंध फुगल्यानंतरही तसेच राहतात. हे पीठ सहज ताणता येते व
चिकटही नसते. ब्रेड बनवतानाही त्याची लवचिकता कायम राहते. संशोधकांनी अशा प्रकारे पीडीआयएल १, १ या प्रथिनाची कमतरता भरून काढणारी तांदळाची प्रजाती विकसित केली असून
ती वेगवेगळ्या हवामानात सहज वाढू शकते.
तांदळाच्या पिठाची वैशिष्टय़े
*तांदळाची प्रथिनयुक्त प्रजाती कुपोषणावर उपयुक्त.
*भात करण्याची कटकट नाही, तांदळाचा ब्रेड करता येणार.
*गव्हाची अ‍ॅलर्जी असलेल्यांना तांदळाच्या ब्रेडचा पर्याय.
*तांदळाची ही प्रजाती विविध हवामानात उत्पादनक्षम.