News Flash

मॉक ड्रीलदरम्यान कॅमेरामनला वाचवण्याचा प्रयत्नात रशियन मंत्रांच्या अपघाती मृत्यू

आपत्कालीन प्रशिक्षणादरम्यान एका माणसाला वाचवताना रशियाचे आपत्कालीन मंत्री झिनिचेव यांचं अपघाती निधन झालं आहे.

Russian Emergencies Minister Yevgeny Zinichev Dies
रशियाचे आपत्कालीन मंत्री येवगेनी झिनिचेव यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. (Photo : Reuters)

रशियाचे आपत्कालीन मंत्री येवगेनी झिनिचेव (Yevgeny Zinichev) यांचं बुधवारी आर्क्टिक प्रदेशातल्या आपत्कालीन प्रशिक्षणादरम्यान (मॉक ड्रील) निधन झालं आहे. आरआयए या वृत्तसंस्थेने रशियन आपत्कालीन मंत्रालयाच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. झिनिचेव हे ५५ वर्षांचे होते. २०१८ पासून झिनिचेव यांनी हाय-प्रोफाइल आपत्कालीन मंत्रालयाचं (Russian Emergencies Minister) नेतृत्व केलं होतं. आपत्कालीन प्रशिक्षणादरम्यान एका माणसाला वाचवताना झिनिचेव यांचं अपघाती निधन झालं. रशियन अध्यक्षीय कार्यालय क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी झिनिचेव यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाही या दुःखद घटनेची माहिती देण्यात आली आहे. आता त्याचा मृतदेह मॉस्कोला आणण्याची तयारी सुरू आहे.

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना दिली माहिती

क्रेमलिनने असं नमूद केलं आहे की रशियन आपत्कालीन मंत्रालयाने अतिशय खेदाने हे कळवलं आहे की, येवगेनी झिनिचेव यांचं आपल्या कर्तव्यावर असताना दुःखद निधन झालं आहे. या दुर्घटनेदरम्यान ते अनेक विभागांसोबत आर्क्टिक प्रदेशात आपत्कालीन परिस्थितीपासून बचाव करण्यासाठीचा सराव (मॉक ड्रील) करत होते. या दरम्यान, एका व्यक्तीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना गंभीर दुखापत झाली आणि रुग्णालयात नेत असतानाच झिनिचेव यांचा मृत्यू झाला.

असा झाला अपघात

रशियाच्या आरटी टेलिव्हिजन चॅनेलच्या मुख्य संपादिका मार्गारीटा सिमोनियन म्हणाल्या की, झिनिचेव्ह हे एका कॅमेरामनसह एका कड्यावर उभे होते. तो कॅमेरामन घसरला आणि काही पाण्यात पडला. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात कि, “दुर्घटनास्थळी मोठ्या संख्येने साक्षीदार होते. नेमकं काय घडलं हे कळण्याच्या आतच त्या कॅमेरामॅनला वाचवण्यासाठी त्यांनी पाण्यात उडी घेतली आणि एका खडकावर आदळले.” दुर्दैवाने त्या कॅमेरामनचा देखील मृत्यू झाल्याचं सिमोनियन यांनी यावेळी सांगितलं.

रशियन आपत्कालीन मंत्रालयाने बुधवारी एका निवेदनात म्हटलं आहे की, झिनिचेव्ह आपत्कालीन प्रशिक्षणावर देखरेख करण्यासाठी आर्क्टिकमध्ये होते, त्यांनी नोरिल्स्कमधील नवीन अग्निशमन केंद्राच्या बांधकाम साइटला भेट दिली. त्याचप्रमाणे, या परिसरातील शोध आणि बचाव पथकाला देखील भेट दिली होती. मंत्री होण्यापूर्वी झिनिचेव यांनी फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसचे उपसंचालकपद आणि कॅलिनिनग्राडच्या कार्यवाहक प्रादेशिक राज्यपाल पदासह अनेक पदं सांभाळली.

रशियाच्या गुप्तचर यंत्रणेसाठी काम

जिनिचेव्हचा जन्म १९६६ मध्ये लेनिनग्राड (आताचे सेंट पीटर्सबर्ग) येथे झाला. १९८७ मध्ये ते रशियन गुप्तचर संस्था KGB चे अधिकारी बनले आणि १९९१ पासून रशियन फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसमध्ये (FSB) महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. विविध पदांवर असताना जिनिचेव्ह यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत अनेक परदेश दौरे केले. रशियन सुरक्षा सेवेचे उपसंचालक म्हणून काम केल्यानंतर जिनिचेव्ह २०१८ मध्ये आपत्कालीन मंत्री झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2021 6:30 pm

Web Title: russian emergencies minister yevgeny zinichev dies during arctic training exercise gst 97
टॅग : Russia,Vladimir Putin
Next Stories
1 अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारबाबत अमेरिका चिंतित; म्हणे, “तालिबानींची कृती…!”
2 गव्हाच्या MSP मध्ये फक्त २ टक्क्यांनी वाढ ; एक दशकातील सर्वात कमी
3 Covid 19: दुसऱ्या लाटेत सर्व मृत्यू निष्काळजीपणामुळे झाल्याचं गृहित धरू शकत नाही – सुप्रीम कोर्ट
Just Now!
X