फक्त भारतातच नव्हे, तर जगभरात करोनाचे विषाणू प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसंख्येला विळखा घालत आहेत. त्यामुळे आख्खं जगच या डोळ्यांनी न दिसणाऱ्या शत्रूविरोधात लढा देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या प्रयत्नांमध्ये सर्व फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य यंत्रणांच्या हाती लस हे एक महत्त्वाचं शस्त्र संशोधकांनी तयार करून दिलं आहे. त्याचा वापर त्या त्या देशातील यंत्रणा योग्य त्या पद्धतीने करू लागल्या आहेत. पण खरंच या लसी शस्त्रास्त्रांसारख्या असू शकतील का? रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीची तुलना थेट रशियन बनावटीच्याच एके-४७ राफलसोबत केली आहे! त्यामुळे करोनाविरोधातल्या लढ्यामध्ये स्पुटनिक लस एके-४७ प्रमाणे काम करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

युरोपियन तज्ज्ञांचं मत योग्यच!

राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना स्पुटनिकचं कौतुक केलं. “करोनावरची आपली लस ही तंत्रज्ञान आणि अनेक दशकांपासून वापरल्या जाणाऱ्या पद्धतींवर आधारलेली आहे. त्याचबरोबर ती अत्यंत आधुनिक आणि निसंशय खूप विश्वासार्ह आहेत. त्या एके-४७ इतक्याच विश्वासार्ह आहेत. हे मत आमचं नसून युरोपियन तज्ज्ञांचं आहे. आणी मला वाटतं ते अत्यंत योग्य आहे”, असं पुतिन म्हणाले आहेत.

दिलासादायक! ‘स्पुटनिक व्ही’ लसीची पहिली खेप भारतात दाखल

भारतानेही केला स्पुटनिकसाठी करार!

जगात सर्वात आधी रशियानं करोनावरच्या लसीला मंजुरी दिली. आणि ती लस होती रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही. जगात पहिल्यांदा अंतराळात सोडण्यात आलेल्या रशियन बनावटीच्या स्पुटनिक यानाच्या नावावरून या लसीचं नामकरण करण्यात आलं होतं. खुद्द व्लादिमिर पुतिन यांनीदेखील या लसीचा पहिला डोस घेऊन ही लस विश्वासार्ह असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर जगभरात मॉडेर्ना, फायझर, बायोएनटेक, कोविशिल्ड, कोवॅक्सिन अशा अनेक लसी आल्या आणि त्या त्या देशांसोबतच इतर देशांमध्ये देखील त्यांचं लसीकरण सुरू झालं. त्यासोबतच स्पुटनिकने देखील लसीचे डोस इतर देशांना निर्यात करायला सुरुवात केली आहे. नुकताच भारत सरकारने स्पुटनिकसंदर्भात रशियासोबत करार केला असून आता या लसीचे डोस भारतात दाखल होऊ लागले आहेत.

स्पुटनिकची परिणामकारकता ९२ टक्के!

स्पुटनिक व्ही लसीची परिमामकारकता ९२ टक्के असल्याचं सांगण्यात येत आहे. स्पुटनिक व्ही लस एस्ट्राजेनेकाच्या लसीसारखी एक व्हायरल वेक्टर लस आहे. मात्र या लसीचे दोन्ही डोस वेगवेगळे आहेत. या लसीचे दोन डोस वेगवेगळे असल्याने करोनावर दूरगामी परिणाम दिसत आहेत. या लसीला आतापर्यंत ६०हून अधिक देशांनी मान्यता दिली आहे. ‘स्पुटनिक व्ही सर्वाधिक प्रभावी लस आहे. त्याचबरोबर करोनाच्या नव्या विषाणूवरही मारक ठरत आहे. या लसीचं देशात लवकरच प्रोडक्शन सुरु होईल आणि वर्षाकाठी ८५० दशलक्ष डोस तयार करण्याचा मानस आहे.’, असं रशियाच्या राजदूतांनी सांगितलं आहे.