गेल्या तीन वर्षांपासून राज्यसभेचा सदस्य असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने पहिल्यांदाच राज्यसभेच्या कामकाजात सक्रीय सहभाग घेत मंत्र्यांना प्रश्न विचारला. सचिनने लेखी स्वरुपात रेल्वे मंत्र्यांना प्रश्न विचारला आणि त्याला लेखी स्वरुपातचे उत्तरही देण्यात आले आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने हे वृत्त दिले आहे.
यूपीए सरकारच्या कार्यकाळात २०१२ मध्ये सचिन तेंडुलकरला राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आले होते. याचवर्षी सप्टेंबरमध्ये त्याची माहिती-तंत्रज्ञान विषयातील संसदीय समितीवरही नियुक्ती करण्यात आली. राज्यसभेच्या सदस्य असूनही सचिन सभागृहाच्या अधिवेशन काळातील दैनंदिन कामकाजात फारसा सहभागी होत नव्हता. अधिवेशनातही तो अल्पकाळासाठीच सभागृहात दिसायचा. राज्यसभेचा सदस्य म्हणून पहिल्यांदाच त्याने रेल्वे मंत्रालयाला लेखी स्वरुपात प्रश्न विचारला. उपनगरी रेल्वेसेवेला स्वतंत्र विभागाचा दर्जा देण्यासाठी काय निकष असतात, असा प्रश्न त्याने विचारला. त्याला रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी उत्तर दिले.
वाहन परवाना देण्यासाठीच्या नियमांमधील बदलांसंदर्भातही त्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाला प्रश्न विचारला आहे. त्यावर सोमवारी मंत्रालयाचे मंत्री उत्तर देण्याची शक्यता आहे.