क्रिकेट रसिकांचा लाडका सचिन तेंडुलकर व ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ सी.एन.आर. राव यांना मंगळवारी एका दिमाखदार कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी किताब बहाल करण्यात आला. ‘भारतरत्न’ने गौरविण्यात आलेला सचिन हा देशातली पहिला क्रीडापटू आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंग, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, अनेक मंत्री, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी तसेच सचिनची पत्नी अंजली, मुलगी सारा व अनेक मान्यवर उपस्थित होते. राव यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून सध्या ते पंतप्रधानांच्या विज्ञान सल्लागार समितीचे प्रमुख आहेत.
४० वर्षीय सचिनने १६ नोव्हेंबरला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत क्रिकेटला अलविदा केला. याच दिवशी सचिनला भारतरत्न जाहीर करण्यात आला होता. कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेटमधील अनेक विक्रम नावावर असलेल्या सचिन तेंडुलकरची कारकीर्द २४ वर्षांची आहे. तेंडुलकर व राव या दोघांनाही यापूर्वी पद्मविभूषणने गौरवण्यात आले होते. १९५४ पासून ज्या ४१ जणांना विशेष कामगिरीसाठी भारतरत्न दिले त्यात आता या दोघांचा समावेश झाला आहे. चार वर्षांनंतर भारतरत्न सन्मान देण्यात आला असून यापूर्वी २००९ मध्ये तो भीमसेन जोशी यांना देण्यात आला होता. पहिले भारतरत्न समाजसुधारक व भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांना १९५४ मध्ये मिळाले होते.
डॉ. राव यांची स्पष्टोक्ती
भारताची विज्ञान क्षेत्रातील प्रगती ‘बरी’ मात्र इतर देशांची ‘वेगवान’
भारताची विज्ञान क्षेत्रातील प्रगती ‘बरी’ आहे असा अभिप्राय नोंदवतानाच अन्य देशांची विज्ञानातील प्रगती ‘स्तुत्य’ असल्याचे मत आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राव यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केले. मात्र, भारताकडून माझा, माझ्या कार्याचा सन्मान होणे याची तुलना कशाशीही करणे शक्य नाही. भारतरत्न पुरस्कार मिळणे अतिशय सुखावह आहे, अशी प्रतिक्रियाही प्रा. चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांनी यावेळी व्यक्त केली. पद्म पुरस्कारांच्या यादीत यंदा १४ शास्त्रज्ञांची नावे आहेत, ही बाब विज्ञान क्षेत्रासाठी अत्यंत उत्साहवर्धक असल्याचे मतही त्यांनी नोंदवले. ‘आजवर मला अनेक पुरस्कार मिळाले. अनेक देशांनी माझ्या कार्याचा गौरव केला, पण माझ्या देशाने केलेल्या सन्मानापेक्षा अन्य काहीही मोठे नाही. या आनंदाची तुलना कोणत्याही पुरस्काराशी करता येणे शक्य नाही,’ असे डॉ. राव म्हणाले. चीन आणि दक्षिण कोरिया यांसारखी राष्ट्रे संशोधनासाठी भरीव आर्थिक तरतुदी करीत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. ‘सॉलिड स्टेट अँड मटेरियल्स’ रसायनशास्त्रात १४०० हून अधिक शोधनिबंध आणि ४५ पुस्तकांचे लिखाण करणारे डॉ. राव हे डॉ. सी.व्ही. रमण, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यानंतर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे तिसरे शास्त्रज्ञ आहेत. आज मी वयाच्या ऐंशीत आहे, पण या वयातही दखल घ्यावी लागेल असे भरीव कार्य माझ्या हातून निश्चितच घडेल, असा विश्वास राव यांनी व्यक्त केला.
भारतीयांसाठी ‘फलंदाजी’ हा एक अद्भुतानुभव आहे. पुरस्काराचा आनंद तर आहेच, पण यापुढेही मी भारतासाठी फलंदाजी सुरुच ठेवणार आहे. माझ्या क्रिकेटला पूर्णविराम मिळाला असला तरी देशासाठी मी फलंदाजी नक्कीच करेन आणि भारतीयांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन.
– सचिन तेंडुलकर
भारत आणि रत्न
फोटो गॅलरी: ‘भारतरत्न’ सचिन आणि सीएनआर राव
उत्तम शिक्षक अन् महान संशोधक!
भारतासाठी माझी फलंदाजी सुरूच राहील- सचिन
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 5, 2014 1:32 am