कोटय़वधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळय़ाप्रकरणी सीबीआयने शनिवारी बीजेडीचे आमदार पी. त्रिपाठी आणि ओदिशातील स्थानिक वृत्तपत्राचे मालक यांच्या निवासस्थानांसह अन्य ५६ ठिकाणांची झडती घेतली.
ओदिशातील ५४ ठिकाणी आणि मुंबईतील दोन ठिकाणी सीबीआयने झडती घेतली असून, या घोटाळय़ातील पैशांचा शोध घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
भुवनेश्वर, बालेसवार आणि ब्रह्मपूर येथील काही ठिकाणी सीबीआयने सकाळीच झडती घेतली. त्रिपाठी यांचे निवासस्थान आणि कार्यालय यांची झडती घेतली. त्याचप्रमाणे अर्थ तत्त्व समूहाच्या व्यवस्थापकीय संचालकांसह अन्य संचालकांच्या नातेवाईकांच्या निवासस्थानांचीही झडती घेण्यात आली.
ओदिशा क्रिकेट असोसिएशनचे सचिव आशीर्वाद बेहरा, स्थानिक वृत्तपत्राचे मालक विकास स्वाइन आणि काँग्रेसचे माजी युवानेते एस. कुंटिया यांच्या निवासस्थानांचीही झडती घेण्यात आली. सीबीआयने आपल्या निवासस्थानाची झडती घेतल्याचे त्रिपाठी यांनी मान्य केले, मात्र या घोटाळय़ात आपला सहभाग असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला.