जस्टिस लोया यांच्या मृत्यूप्रकरणी दाखल पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यात निर्णय देताना न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं सांगितलं होतं. आपला हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत याचिका फेटाळली आहे. बॉम्बे लॉयर्स असोसिएशनं ही पुनर्विचार याचिका दाखल केली होती. याचिकेत जस्टीस लोया यांच्या मृत्यूचा राजकीय फायदा घेण्यात आल्याचंही म्हटलं होतं.
मुख्य न्यायाधीश दिपक मिश्रा, खानविलकर आणि चंद्रचूड यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळताना सांगितलं की, ‘आम्ही पुनर्विचार याचिका आणि त्यासंबंधीचे सर्व कागदपत्रं पडताळून पाहिले. दिलेल्या निर्णयावर विचार करण्याचं कोणतंही ठोस कारण आम्हाला मिळालं नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळली आहे’.
जस्टीस लोया यांचा मृत्यू १ डिसेंबर २०१४ रोजी नागपूरमध्ये झाला होता. आपल्या सहकारी न्यायाधीशाच्या मुलीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी जस्टीस लोया अन्य दोन न्यायाधीशांसह नागपूर येथे गेले होते. मात्र, तिथेच ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणाची सुनावणी जस्टीस लोया यांच्यासमोर सुरू होती. या प्रकरणात भाजपचे अध्यक्ष अमित शहा आरोपी होते. त्यामुळे जस्टीस लोयांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. मात्र, लोया कुटुंबानेच या प्रकरणी कोणताही संशय नसून तपास यंत्रणांवर पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट केले होते.