नवी दिल्ली: धर्मनिरपेक्षता हे तत्त्व व त्याची अंमलबजावणी या दोन्ही गोष्टी भारतामध्ये धोक्यात आल्या आहेत असे मत काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मुलाखतीत व्यक्त केले आहे.

‘दी बॅटल ऑफ बिलाँगिंग’ हे त्यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले असून  त्यांनी सांगितले की, ‘हिंदूुत्वाची आपल्याकडची विचारसरणी ही धार्मिक नसून राजकीय अधिक आहे.

भारतात धर्मनिरपेक्षता हे तत्त्व व त्याची अंमलबजावणी धोक्यात आहे. पण द्वेषमूलक शक्ती देशाचे धर्मनिरपेक्ष स्वरूप बदलण्यात यशस्वी होणार नाहीत.’ तुम्ही हिंदुत्ववादी भारताच्या संकल्पनेस विरोध केला आहे पण भाजपचा जो उदय झाला आहे त्यावरून देशातील लोकांना हिंदुत्व मान्य आहे असाच होतो किंवा हिंदुत्वाच्या लोकप्रियतेची कारणे काय आहेत असे विचारले असता त्यांनी सांगितले की,‘ हे मला मान्य नाही. भाजपला गेल्या वर्षी ३७ टक्के मते मिळाली हे  बहुमत नाही.

हिंदुत्वाची लोकप्रियता पाहता  काँग्रेसला सौम्य हिंदुत्वाचा आधार घ्यावा लागेल काय या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, ‘आम्ही काँग्रेसला सौम्य भाजपचे रूप देणार नाही. कारण त्यामुळे काँग्रेस शून्य होईल. काँग्रेस म्हणजे भाजप नव्हे त्यामुळे सौम्य हिंदुत्व स्वीकारण्याचा प्रश्न नाही. हिंदुत्ववाद व हिंदुत्व यात फरक आहे असे थरुर यांनी नमूद केले.