शहीद जवान औरंगजेबचे दोन्ही भाऊ भारतीय लष्करात रुजू झाले आहेत. देशसेवेचा वसा चालवण्याचा कामच त्यांनी हाती घेतलं आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. मोहम्मद तारीक आणि मोहम्मद शब्बीर अशी औरंगजेबच्या दोन भावांची नावं आहेत. १०० जवानांची भरती लष्करात करण्यात आली त्यामध्ये शहीद औरंगजेबच्या दोन्ही भावांचाही समावेश आहे. आमच्या मुलांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला याचा आम्हाला अभिमान वाटतो असं औरंगजेबच्या आई वडिलांनी म्हटलं आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात औरंगजेब या भारतीय जवानाचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आली होती. जम्मू काश्मीर येथील पुलवामा या ठिकाणाहून दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले आणि त्यानंतर त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. औरंगजेब हा मूळचा पुँछ जिल्ह्यातील रहिवासी होता. औरंगजेब ४४ राष्ट्रीय रायफल बटालियनमध्ये रायफलमॅन म्हणून तैनात होता. ईदच्या सुट्टीसाठी तो घरी जात असताना दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण करु त्याची हत्या केली. औरंगजेब हा दहशतवाद विरोधी पथकाचाही सदस्य होता. औरंगजेबची हत्या झाल्यानंतर त्याचे हाल कशा पद्धतीने करण्यात आले त्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्याच्या निधनानंतर संपूर्ण देशाने शोक व्यक्त केला.

गौरवाची बाब ही की याच शहीद औरंगजेबच्या दोन्ही भावांनी भारतीय लष्करात जाण्याचा निर्णय घेतला आणि ते लष्करी सेवेत रुजू झाले आहेत. या दोघांच्या आई वडिलांनी आपल्या मुलांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे अवघ्या देशाला अभिमान वाटेल अशीच ही या दोघांची कृती आहे.