केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्यामध्ये झालेला ट्विटरवरील वाद आता थेट कोर्टात जाण्याची शक्यता आहे. शशी थरूर यांनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून रविशंकर प्रसाद यांना कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले आहे. नोटीसमध्ये रविशंकर यांनी थरूर यांच्यावर खोटे आणि अपमानास्पद आरोप केल्याचे म्हटले आहे. तसेच ४८ तासांमध्ये रवीशंकर प्रसाद यांनी माफी मागावी अथवा कायदेशीर कारवाईसाठी तयार रहावे असेही थरूर यांनी आपल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे.

काय होते ट्विट

रविशंकर प्रसाद यांनी एक ट्विट करुन शशी थरूर हे हत्येचे आरोपी असल्याचे म्हटले होते. “शशी थरूर एका हत्येच्या प्रकरणात आरोपी आहेत. त्यांनी भगवान शंकराचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. एका काँग्रेसच्या खासदाराने एका हिंदू देवतेच्या केलेल्या या व्याख्येसंदर्भात स्वत:ला शिवभक्त म्हणवणाऱ्या राहुल गांधीकडून उत्तर अपेक्षित आहे. राहुल गांधीनी सर्व हिंदूंची माफी मागायला हवी”, असे ट्विट रविशंकर प्रसाद यांनी केले होते. आता रविशंकर प्रसाद थरुर यांच्या नोटीसला काय उत्तर देतात की माफी मागून प्रकरणावर पडदा टाकतात हे लवकरच समजेल.

काय आहे संपूर्ण प्रकरण

काँग्रेस नेते शशी थरूर हे सध्या ‘द पॅराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर’ या आपल्या नव्या पुस्तकामुळे चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिंडीवर बसलेल्या विंचवासारखे असल्याचे राष्ट्रीय स्वंयसेवक संघातील एका खास सूत्राचे म्हणणे आहे. त्या सूत्राने एका पत्रकाराला ही गोष्ट सांगितली होती. या पत्रकाराचा उल्लेख थरुर यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

बेंगळुरु लिट फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या थरूर यांनी आपल्याच पुस्तकातील काही पाने उपस्थितांसमोर वाचून दाखवली. ते म्हणाले होते की, ‘आरएसएसमधील एका सूत्राने याचा एका पत्रकारासमोर उल्लेख केला होता. मी त्याचा संदर्भ माझ्या पुस्तकात दिला आहे. मोदी हे पिंडीवरचे असे विंचू आहेत की, ज्याला तुम्ही आपल्या हाताने काढू शकत नाही किंवा चपलेने मारुही शकत नाही.’