News Flash

“राम मंदिराची पायाभरणी झाली असली तरी उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ नाही तर जंगलराज”

हाथरस घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेवरून शिवसेनेची योगी सरकारवर टीका

(संग्रहित छायाचित्र)

उत्तर प्रदेशातील अयोध्येत राममंदिराची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाली आहे, पण उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ वगैरे नसून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत ‘जंगलराज’ आहे. महिलांवर अत्याचार सुरूच आहेत, पण तरुणींवर बलात्कार आणि खून करण्याच्या घटना योगींच्या राज्यात वाढल्या आहेत. हाथरसमध्ये १९ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार व नंतर खून झाला. त्यानंतर देशात गदारोळ उडाला आहे, असं म्हणत शिवसेनेनं योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे.

मरणाच्या दारात असताना तिने बलात्कार झाल्याचे सांगितले. आता उत्तर प्रदेशचे सरकार म्हणते बलात्कार वगैरे सगळे झूठ आहे. पाठोपाठ बलरामपूरमध्येही सामूहिक बलात्काराचे प्रकरण झाले, पण ना दिल्लीतील अश्रूंचा बांध फुटला ना योगी सरकारच्या डोळय़ांच्या कडा ओलावल्या. बलात्कार झालाच नाही तर विरोधकांनी बोंबलायचे कशाला? असे सरकारच बोंबलत असल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून या प्रकरणावर टीका केली आहे.

आणखी वाचा- “हाथरस, बलरामपूर प्रकरणात हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे?”

बलात्कार झालाच नाही, तर रात्रीच्या अंधारात त्या तरुणीचा मृतदेह पोलिसांनी पेट्रोल ओतून का जाळला? पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला निघालेल्या राहुल गांधी यांना अडवलेच, पण त्यांना कॉलर पकडून धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडले. देशातील एका प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यास असे वागवणे, अपमानित करणे हे लोकशाहीवर ‘गँगरेप’ होत असल्याचेच लक्षण असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

‘‘महिलांवरील बलात्कार, अत्याचारांबाबत आवाज उठवाल तर याद राखा’’ असेच जणू योगी सरकारने बजावले आहे. हाथरसच्या एका गावात पीडित महिलेच्या माता-पित्यांना पोलिसांनी कोंडून ठेवले आहे. संपूर्ण गाव बंदूकधारी पोलिसांनी घेरून ठेवले आहे. जिल्हाधिकारी पीडितेच्या कुटुंबीयांना सरळ सरळ धमकावत असल्याची टेप समोर आली आहे. ‘‘आज हे मीडियावाले गावात आहेत. ते दोन दिवसांत जाणारच आहेत. मग तुम्ही काय करणार? तुम्हाला आमच्याशीच बोलावे लागेल. तेव्हा आता तोंड बंद ठेवा!’’ असे धमकावणाऱ्या अधिकाऱ्यांनी माणुसकीला काळिमा फासला आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

आणखी वाचा- जर सरकारने काहीच चुकीचे केले नाही, तर माध्यमांची अडवणूक का? : संजय राऊत

“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे संन्यासी आहेत. ते भगव्या कपडय़ांत वावरतात. पंतप्रधान मोदी हे तर फकीर आहेत, पण मोदी यांना जगातील सर्वोच्च दर्जाची सुरक्षा आहे. योगी यांनाही मोठी सुरक्षा आहे. अखिलेश सरकारने एकदा योगींची सुरक्षा मागे घेतली तेव्हा संसदेच्या सभागृहात याच योगी महाराजांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. आज तेच योगी मुख्यमंत्री आहेत, पण अबलांना, मातांना सुरक्षा नाही. बलात्काराने विटंबना झालेले अबलांचे मृतदेह पोलीस पेट्रोल ओतून जाळत आहेत. हे नराधम कृत्य हिंदुत्वाच्या कोणत्या परंपरेत बसते? मृतदेहाची विटंबना करू नका, मृतदेहांनाही सन्मानाने अंत्यसंस्कार होण्याचा अधिकार आहे, पण मृतदेह पेट्रोल ओतून कोणत्याही रूढी-परंपरेशिवाय जाळले जात असतील तर ती महिला देहाची, हिंदू संस्कृतीची विटंबनाच आहे. अयोध्येतील सीतामाईही आज भयाने, वेदनेने धरणीत गडप झाली असेल,” असंही संपादकीयमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 12:52 pm

Web Title: shiv sena saamna editorial criticize yogi adityanath government hathras gang rape girl died jud 87
Next Stories
1 हाथरस प्रकरण एक ‘छोटासा मुद्दा’, पीडितेवर बलात्कार झाला नाहीः उत्तर प्रदेशातील मंत्र्याचा दावा
2 “आज फक्त अटलजींचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही”; मोदींच्या हस्ते अटल बोगद्याचं उद्घाटन
3 भारतानं ओलांडला करोनाबाधितांच्या मृत्यूचा एक लाखांचा टप्पा
Just Now!
X