कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आणि अनेक नाट्यमय घटनानानंतर कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले. याबाबत आज शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्यपाल वजुभाई वाला यांच्यावर तिरकस शब्दात टीका करण्यात आली आहे.

कर्नाटकात भाजपचे येडियुरप्पा यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळाले, यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. कायदा, घटनेनुसार नाही तर राजकीय नियमानुसारच हे घडले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात मंत्रिमंडळात राज्यपाल वजुभाईंनी १४ वर्षे काम केले आहे व मोदी यांच्या कृपेनेच ते कर्नाटकच्या राज्यपालपदी बसले आहेत. त्यामुळे भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले हे बरोबर आहे. कारण आमच्या न्यायपालिकांपासून राज्यपालांपर्यंत कोणीच आंधळ्या न्यायदेवतेच्या तत्त्वास जागत नाहीत, अशा शब्दात सामनातून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

राज्यपाल वाला हे भारतीय जनता पक्षाचे नम्र सेवक आहेत. राज्यपाल वजुभाई वाला यांनी ‘काँग्रेस-जेडीएस’ आघाडीचे नेते कुमारस्वामी यांना सरकार स्थापनेसाठी बोलावले असते तर आश्चर्य वाटले असते, पण आमच्या न्यायपालिकांपासून राज्यपालांपर्यंत कोणीच आंधळ्या न्यायदेवतेच्या तत्त्वास जागत नाहीत. त्यामुळेच ११६ आमदारांच्या सह्या असल्याचा दावा धुडकावून १०४ जागांसाठी पायघड्या घातल्या जातात. हे सर्व काँग्रेस राजवटीत घडले असते, तर ती लोकशाहीची हत्या ठरली असती व राज्यपाल हे सत्ताधाऱ्यांच्या हातचे कळसूत्री बाहुले ठरले असते. पण आता राज्यपाल भाजप विचारांचे असल्याने त्यांनी कोणताही गुन्हा केला नाही व ते लोकशाही मूल्यांना धरून वागले आहेत हे मान्य केले पाहिजे, अशी बोचरी टीकाही ‘सामना’तून करण्यात आली आहे.

काँग्रेसला घालवून काहीच फरक पडला नाही

गोवा आणि मणिपूरमध्ये एक न्याय व कर्नाटकात दुसरा न्याय हे पुन्हा दिसले. नियम व कायदा दुसऱ्यांसाठी आणि स्वतः मात्र हव्या त्या बेबंद मार्गाने सत्ता मिळवायची व टिकवायची हेच नवे धोरण उदयास आले आहे. नीतिमत्तेची अपेक्षा काँग्रेसकडून करता येत नव्हती, म्हणून लोकांनी भारतीय जनता पक्षाला खांद्यावर घेऊन नाचवले, पण त्यांचेही पाय मातीचेच निघाले.

कर्नाटकातून काँग्रेसचे नामोनिशाण मिटावे व भाजपचे राज्य यावे हे आमचेही मत आहे, पण सिद्धरामय्या गेले व भ्रष्ट येडियुरप्पाच पुन्हा भाजपकडून खुर्चीवर विराजमान झाले. बेल्लारीत गाजलेले व भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली प्रदीर्घ तुरुंगवास भोगलेले बेल्लारीचे खाण माफिया रेड्डी ब्रदर्सही पुन्हा भाजपच्या तिकिटावर निवडून आले. त्यांच्याच काळ्या पैशांवर आमदारांची खरेदी जोरात सुरू आहे. काळा पैसा परदेशातून परत आणायचा होता तो काळा पैसा येथेच आहे व सत्ताकारणात वापरला जात आहे. भाजपची ‘मन की बात’ आता ‘धन की बात’ झाली असेल तर मग काँग्रेसला घालवून काय फरक पडला?, असा सवालही भाजपला विचारण्यात आले आहे.

येडियुरप्पा देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री असल्याची अमित शहांची ‘बात’ योग्यच!

येडियुरप्पा हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री असल्याची ‘बात’ अमित शहा यांनी प्रचाराच्या सुरुवातीला अनवधानाने केली होती, ते सत्यच होते. जे पोटात होते तेच ओठावर आले. त्याच येडियुरप्पांना पुन्हा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावर बसविण्याची नामुष्की भाजपवर आली. कर्नाटकात यापुढचे चित्र गोंधळाचे राहील. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयांवरचे लक्ष उडवले जाईल. यालाच चाणक्यनीती व राज्य करणे म्हणतात. ज्यांना हे जमत नाही ते मूर्ख, तसेच देशद्रोही ठरतात, असा भाजपचा समाचारही ‘सामना’तून घेण्यात आला आहे.