लेखिका शोभा डे आणि वाद हे नित्याचेच झाले आहे. वादग्रस्त ट्विट करून त्या सतत चर्चेत असतात. परंतु गुरूवारी त्यांनी एक नवे ट्विट करून रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांची खिल्ली उडवली आहे. नोटाबंदीच्या या संपूर्ण प्रकारात ‘बळीचा बकरा’ असे त्यांनी उर्जित पटेल यांना संबोधले आहे. आपण यांना पाहिलंत का ? असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे. कृपया तुम्ही घरी या, तुम्हाला माफ केलं आहे, असे आवाहनही करण्यात आले आहे. शोभा डे यांच्या या ट्विटनंतर नेटिझन्सनी शोभा डे यांच्यावर टीकेचा भडिमार केला आहे.

शोभा डे यांनी नोटाबंदीच्या प्रकारात उर्जित पटेल यांना बळीचा बकरा बनवल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, आपण यांना पाहिलंत का? उर्जित पटेल, वय ५३, शेवटचे दिसल्याचे ठिकाण- आरबीआय इमारत, कृपया घरी या, तुम्हाला माफ केलं आहे. शोधून देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल, असे आशयाचे ट्विट करून त्यांनी उर्जित पटेल यांची खिल्ली उडवली आहे.

शोभा डे यांनी प्रारंभी नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले होते. परंतु सध्या देशभरात सुरू असलेल्या ‘चलन’कल्लोळाबाबत उर्जित पटेलांना बळीचा बकरा बनवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. यापूर्वीही शोभा डे यांनी अनेकवेळा ट्विट करून वाद ओढावून घेतला होता.
दोन महिन्यांपूर्वी ऑलिम्पिक स्पर्धेवेळी त्यांनी भारतीय खेळाडूंवर टीका केली होती. त्यांच्या ट्विटवरून बरेच वादळ उठले होते. भारताला रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणाऱ्या पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक व जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांना सचिन तेंडुलकर याच्या हस्ते बीएमडब्ल्यू भेट देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी खेळाडूंना दिलेल्या बीएमडब्ल्यू त्यांच्यासाठी पांढरा हत्ती न ठरो अशी आशा व्यक्त केली होती. तसेच रिओला जाऊन सेल्फी काढायचे आणि रिकाम्या हातांनी परतायचे, हेच भारतीय खेळाडूंचे रिओ ऑलिम्पिकमधील लक्ष्य असल्याचे ट्विटरवर म्हटले होते. भारतीय खेळाडू पैसा आणि संधी दोन्हीचा अपव्यय करत असल्याचेही म्हणाल्या होत्या.