जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाशी (पीडीपी) केलेली युती देशासाठी घातक असल्याचे म्हटले. पीडीपीशी युती करून नरेंद्र मोदी अल्पकालीन राजकीय फायदा मिळवू पाहत आहेत. मात्र, भविष्यात या अभद्र युतीची देशाला मोठी किंमत मोजावी लागेल, असे राहुल यांनी म्हटले. मोदी सरकारच्या धोरणांमुळेच दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये आपली पाळेमुळे आणखी घट्ट रोवण्यास मदत होत असल्याचा आरोपही यावेळी राहुल यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांमध्ये अनेकदा आपली गोष्ट पटवून देण्यासाठी लोकांना एखादे आकर्षक सूत्र तयार करून सांगतात. त्याच पद्धतीचा वापर करून आज राहुल यांनी मोदींवर टीका केली. मोदींचा वैयक्तिक फायदा= भारताचे धोरणात्मक नुकसान + निष्पाप भारतीयांचा रक्तपात, हे सूत्र देशासाठी धोकादायक असल्याचे राहुल यांनी म्हटले.

अमरनाथच्या भाविकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) व भाजप यांच्यातील ‘अनैसर्गिक युती’ पुन्हा एकदा दोलायमान झाली आहे. पण एकंदरीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांची सौम्य व सावध वक्तव्ये पाहता, कोणताही ‘टोकाचा निर्णय’ नजीकच्या काळात घेतला जाण्याची शक्यता कमी आहे. ‘‘अमरनाथ यात्रेवरील हल्ला भाजपसाठी धक्काच आहे. आमच्या मतपेढीच्या गाभ्यालाच धक्का बसला आहे. त्यामुळे पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबरील युती तोडून टाकण्यासाठी आमच्यावरील दबाव आणखी वाढेल,’’ अशी टिप्पणी भाजपच्या एका नेत्याने मंगळवारी केली. पीडीपीबरोबरील युती भाजप कार्यकर्त्यांना, संघपरिवाराला व हिंदुत्ववादी मतपेढीला पहिल्यापासूनच पटली नसल्याची पुस्तीही त्याने जोडली.

जम्मू काश्मीरमधील सरकार बरखास्त करा- सुब्रमण्यम स्वामी

एकीकडे या ‘अनसर्गिक’ युतीचा फेरविचार करण्याबाबत आतून दबाव वाढत असताना दुसरीकडे गृहमंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया अत्यंत सावध, सौम्य आणि ‘काश्मिरीरियत’ला सलाम करणारी होती. ‘‘या दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व स्तरांतील काश्मिरी जनता पुढे आली.  जनतेच्या मनातील ‘काश्मिरीरियत’लाही मी सलाम करतो,’’ असे राजनाथ म्हणाले. सर्वाना सामावून घेणाऱ्या काश्मिरींच्या संस्कृतीला ‘काश्मिरीरियत’ असे म्हटले जाते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्याचा पहिल्यांदा उल्लेख केल्याचे मानले जाते. मध्यंतरी पंतप्रधान मोदी यांनीही ‘काश्मिरीरियत’चा उल्लेख केला होता.

सरकार अपयशी, जम्मू-काश्मीर लष्कराकडे सोपवा; तोगडिया