केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची गुरुवारी कॉंग्रेसच्या कार्यकारी समितीचे (वर्किंग कमिटी) कायमस्वरुपी निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही नियुक्ती केल्याचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी पत्रकारांना सांगितले. कार्यकारी समिती ही कॉंग्रेसमधील निर्णय घेणारी सर्वोच्च समिती आहे. 
लोकसभेचे नेते आणि पक्षाच्या कोअर ग्रुपचे सदस्य असलेले शिंदे हे आतापर्यंत कार्यकारी समितीचे सदस्य नव्हते. महत्त्वाच्या मुद्दयांवर पक्ष आणि केंद्रातील सरकार यांच्यामध्ये दुवा साधण्याचे काम सुशीलकुमार शिंदे करतात. त्यामुळेच त्यांची कार्यकारी समितीवर नियुक्त करण्यात आली आहे. याआधी पी. चिदंबरम हे देखील कॉंग्रेसच्या कोअर ग्रुपचे सदस्य असताना बरेच वर्ष कार्यकारी समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून कार्यरत होते.