स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी केला असताना लष्कराच्या एका जवानाने रेल्वेमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देणारा फोन केल्याचा प्रकार घडला आहे. राजधानी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन दिल्लीतील नियंत्रण कक्षाला शनिवारी रात्री उशिरा आला होता. राजधानी एक्स्प्रेस चुकवायची नसल्याने जवानाने हा प्रकार केल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे.

शनिवारी रात्री उशिरा नवी दिल्लीतील नियंत्रण कक्षाला नवी दिल्ली-बंगळुरु राजधानी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती देणारा एक निनावी फोन आला. यानंतर राजधानी एक्स्प्रेसमध्ये थांबवून रात्री ११ वाजता तपासणीला सुरुवात झाली. रात्री १२.४५ पर्यंत बॉम्बचा शोध सुरु होता. मात्र बॉम्बशोधक पथकांच्या हाती काहीच लागले नाही. यानंतर पोलिसांकडून निनावी नंबरचा शोध घेण्यात आला. या मोबाईल नंबरचे लोकेशन त्याच ट्रेनमध्ये असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी निनावी कॉल करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.

राजधानी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव मोहम्मद अली असे असल्याचे चौकशीतून समजले. मोहम्मद अली भारतीय लष्करात असून तो सिकंदराबाद येथील त्याच्या घरी कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी जात होता. राजधानी एक्स्प्रेस चुकू नये यासाठी मोहम्मदने नियंत्रण कक्षाला फोनवरुन खोटी माहिती दिली, असे पोलिसांनी सांगितले. यानंतर मोहम्मद अलीला अटक करण्यात आली.

‘मोहम्मद अलीवर आयपीसीच्या ३५३ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच चौकशीवेळी जवानाने रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत गैरवर्तन केले,’ अशी माहिती आग्र्याचे स्टेशन ऑफिसर मणीकांत शर्मा यांनी दिली. ‘जवान जालंधरहून सिकंदराबादला येत होता. सिकंदराबादला थेट कोणतीही ट्रेन नसल्याने त्याला दिल्लीहून दुसरी ट्रेन पकडायची होती,’ अशी माहिती आग्रा विभागाचे विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक संचित त्यागी यांनी दिली.

‘शनिवारी संध्याकाळी दिल्लीला पोहोचल्यावर संबंधित जवान नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीनमध्ये या दोन स्थानकांमुळे थोडासा गोंधळला. त्यानंतर कोणीतरी या जवानाला त्याची ट्रेन हजरत निजामुद्दीनवरुन काही मिनिटांमध्ये निघणार असल्याची माहिती दिली. ही ट्रेन पकडण्यासाठी जवानाने नियंत्रण कक्षाला फोन करुन बॉम्ब ठेवण्यात आल्याची खोटी माहिती दिली. त्यामुळे ट्रेन थांबवण्यात आली आणि जवानाला ट्रेन पकडता आली,’ असेही त्यागी यांनी सांगितले.