दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) बुधवारी सीए अंतिम वर्ष आणि फाऊंडेशनचा निकाल जाहीर केला. राजस्थानमधील कोटा येथील शादाब हुसैन हा ८०० पैकी ५९७ गुण घेऊन सीए अंतिम परिक्षेत (जुना अभ्यासक्रम) प्रथम क्रमांक पटकावला आहे. एका साधारण कुटुंबातून आलेल्या शादाबने पहिल्याच प्रयत्नात सीए अंतिम परीक्षा पास केली आहे. शादाबचे वडील व्यवसायाने टेलर आहेत. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तर शादाबने कोटा विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी मिळवलेली आहे. त्याला चार बहिणी आहेत. त्याचे आई-वडील जरी अल्पशिक्षित असले तरी त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात कोणतीच कसर ठेवलेली नाही.

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार शादाबने म्हटले की, उतरत्या वयाची माझ्या आई-वडिलांनी चिंता करू नये यासाठी चांगली नोकरी मिळावी म्हणून मी दिवस-रात्र अभ्यास केला. त्यात मला यश आले. सीए हा एक असा व्यवसाय आहे, ज्यामध्ये व्यक्ती आयुष्यभर शिकत राहतो. खूप सल्लामसलत आणि चर्चा केल्यानंतर मी सीए होण्याचे लक्ष्य निश्चित केले.

परीक्षेसाठी केलेल्या नियोजनाबाबत तो म्हणाला की, मी सर्वांत प्रथम पेपर शांतपणे वाचून काढला. मला ४० गुण मिळू शकतील असे तीन-चार प्रश्न निवडले. ही प्रश्नं मी एका तासात संपवण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने मी दोन तासात आधिकाधीक गुण मिळवण्यावर खर्च केला. मला यात यश ही आले. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शादाबला शुभेच्छा दिल्या आहेत.