गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक कलहाने ग्रासलेल्या समाजवादी पक्षात गुरुवारी आणखी फूट पडली आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी २३५ उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. मुलायमसिंह यादव यांनी समर्थकांना डावलल्याने अखिलेश यादव यांनी वेगळी यादी जाहीर करुन बंडाचा झेंडाच फडकावला आहे. दोन नेत्यांनी वेगवेगळी यादी जाहीर केल्याने समाजवादी पक्ष दुभंगल्याचे दिसते.

गुरुवारी अखिलेश यादव यांनी २३५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सकाळी अखिलेश यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांची भेट घेतली होती. यानंतर रात्री अखिलेश यांनी स्वतःची वेगळी यादी जाहीर केली. यामध्ये विद्यमान १७१ आमदारांना तिकिट देण्यात आले आहे. हे सर्व आमदार अखिलेश यादव यांचे समर्थक आहेत. अयोध्यामधून अखिलेश यादव यांनी त्यांचे विश्वासू सहकारी पवन पांडे तर रामनगरमधून अरविंद सिंह गोप यांना उमेदवारी दिली आहे. हे दोघेही अखिलेश यांचे निकटवर्तीय असले तरी मुलायमसिंह यांनी जाहीर केलेल्या यादीत या दोघांनाही स्थान मिळाले नव्हते. अखिलेश यांचे समर्थक विविध मतदारसंघातून अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल करतील अशी शक्यता आहे. ‘मतदारसंघात जाणार, जिंकून येणार आणि अखिलेश यांनाच मुख्यमंत्री बनवणार’ असा निर्धार पवन पांडे यांनी व्यक्त केला.

बुधवारी मुलायमसिंह यादव यांनी ३२५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या यादीत मुलायम यांचे बंधू शिवपाल यादव यांना जसवंतनगरमधून उमेदवारी देण्यात आली. तर विद्यमान मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले नव्हते. मुलायमसिंह यांनी निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार नाही असे सांगत अखिलेश यांना सूचक इशाराही दिला होता. उर्वरित उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करु असे ते म्हणाले होते.

गुरुवारी अखिलेश यांनी मुलायमसिंह यांच्यासोबत यादीविषयी चर्चा केली. पण त्यांनी यादीत बदल करण्यास नकार दिल्याने अखिलेश यादव यांनी स्वतंत्र यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे उत्तरप्रदेश विधानसभेत ४०३ जागा आहेत. यातील ३२५ जागांसाठी आधीच यादी जाहीर झाली होती. तर अखिलेश यांनी आता २३५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यावरुन अखिलेश यांनी बंडांचा झेंडा रोवल्याचे स्पष्ट होते. आता पुढीलवर्षी होणा-या निवडणुकीत उत्तरप्रदेशमध्ये अखिलेश यादव विरुद्ध मुलायमसिंह यादव या पितापुत्रांमध्ये लढत पाहायला मिळेल असे दिसते. शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांच्यात वाद असून या वादात मुलायमसिंह यादव यांनी मुलाऐवजी बंधू शिवपालला साथ दिली आहे.