शेजारी देशांशी सलोख्याचे संबंध राखण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करून देशातील सत्तापालटामुळे भारत आणि भूतानमधील नात्यांत कोणताही बदल होणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी स्पष्ट केले. पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यानंतर मोदी पहिल्यांदाच भूतान दौऱयावर आले आहेत. पंतप्रधान म्हणूनही त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. भूतानमधील संसदेच्या संयुक्त अधिवेशनामध्ये बोलताना मोदींनी दोन्ही देशांतील संबंधांवर भाष्य केले.
ते म्हणाले, शेजारी देशांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. जर भारताची प्रगती झाली तर त्याचा फायदा आपसूकच शेजारी देशांच्या प्रगतीमध्ये होईल. भारतात स्थिरता आणि विकास होत राहिला तर भूतानलाही त्याचा फायदाच होईल.
हिंदीतून केलेल्या भाषणामध्ये मोदींनी भूतानमध्ये शांततेत राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाही अस्तित्त्वात आल्याबद्दल कौतुक केले. मोदी यांचे दौन दिवसांच्या भेटीसाठी रविवारी भूतानमध्ये आगमन झाले.