जेएनयूमधील पाच विभागाच्या अधिष्ठात्यांना चौकशी समितीच्या अहवालाचा तपशील नाही

जेएनयू विद्यार्थ्यांचा नेता कन्हैयाकुमार याच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विद्यार्थ्यांचा एक मोर्चा संसदेवर नेण्यात आला आणि दोन विद्यार्थ्यांच्या सुटकेची मागणी करण्यात आली. शैक्षणिक संस्थांवर कारवाई केल्याबद्दल केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणीही या वेळी करण्यात आली. दरम्यान, जेएनयूमधील पाच विभागांच्या अधिष्ठात्यांनी कुलगुरूंना पत्र लिहून आपल्याला चौकशी समितीच्या अहवालाचा सविस्तर तपशील देण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आम्ही सर्व जण तिची मुले आहोत, असे इराणी म्हणतात, परंतु त्यांनी आपली अथवा रोहित वेमुलाची आई यांच्याशी कधी संवाद साधला का, त्यामुळे आपण तिचा मुलगा असल्याचे नाकारतो, ज्या पद्धतीने शैक्षणिक संस्थांवर हल्ला करण्यात आला त्याबद्दल इराणी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कन्हैयाकुमारने विद्यार्थ्यांसमोर बोलताना केली.

हा मोर्चा केवळ कन्हैया अतवा उमरला वाचविण्यासाठी नाही तर तो लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी आहे. देशात हुकूमशाही आली तर त्याचा पहिला फटका शैक्षणिक संस्थांना बसतो. जर तुम्ही जेएनयू अथवा शिक्षणाच्या बाबतीत बोललात तर त्याला अर्थ आहे, काही जणांना अराजक पसरविण्याची इच्छा आहे, मात्र त्यांची भीती बाळगू नका, अशा प्रकारचा हल्ला आम्ही सहन करणार नाही, असेही कन्हैया म्हणाला.

..तरच जेएनयूप्रकरणी कारवाई

जेएनयू विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार आणि अन्य विद्यार्थ्यांवर कोणती कारवाई करावयाची या बाबतचा निर्णय या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर बजावण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिसीला उत्तर दिल्यानंतर घेण्यात येईल, असे जेएनयूच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जेएनयूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वादग्रस्त कार्यक्रमाला अनुसरून कन्हैयाकुमार, उमर खलिद, अनिर्बन भट्टाचार्य आणि अन्य दोघांना काढून टाकावे, अशी शिफारस उच्चस्तरीय समितीने केली होती.

कन्हैयावर हल्ल्याचा प्रयत्न

करणाऱ्या चौघांना अटकनवी दिल्ली : जेएनयू विद्यार्थ्यांचा नेता कन्हैयाकुमार याच्या नेतृत्वाखाली संसदेवर मोर्चा नेण्यात आला असता त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी चार जणांना प्रतिबंधात्मक अटक केली.

संसद मार्ग पोलीस ठाण्याजवळ कन्हैयाकुमार भाषण करीत असताना तीन जणांनी त्याला लाखोली वाहिली तेव्हा त्या तिघांना पोलिसांनी तेथून बाहेर काढले तर एक जण कन्हैयाकुमार ज्या ट्रकवर उभा राहून भाषण करीत होता त्या ट्रकवर गेला.

कन्हैयाकुमार याने सुरक्षा रक्षकांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल त्याच्याविरुद्ध घोषणा देण्यास सुरुवात होताच जेएनयू विद्यार्थ्यांनी मानवी साखळी केली आणि धोक्याची सूचना दिली. चौथ्या व्यक्तीने साखळी तोडली परंतु त्यालाही पोलिसांनी तेथून बाहेर काढले.

कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून या चौघांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली आहे, असे एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या चौघांपैकी एक सलूनमध्ये, दुसरा हॉटेलमध्ये, तिसरा विमा कर्मचारी आणि चौथा गाडय़ांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करणारा आहे. त्यांना सायंकाळी सोडून देण्यात आले.