पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या त्यांच्या कार्यक्रमाद्वारे देशभरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोना, शेतकरी, खेळणी उद्योग आदी विविध मुद्यांवर भाष्य केलं. परंतु, सध्या देशातील राजकारण ज्या गोष्टीवरून तापल्याचे दिसत आहे. त्या जेईई व नीट या परीक्षांच्या संदर्भात काहीच भाष्य केले नाही. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर ट्विट करत निशाणा साधला आहे.

”पंतप्रधानांनी ‘परीक्षेवर चर्चा’ करावी असं ‘जेईई-नीट’च्या परीक्षार्थींना वाटत होतं. मात्र, पंतप्रधानांनी केली ‘खेळण्यांवर चर्चा’.” अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला.

या अगोदर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’द्वारे संपूर्ण देशाशी संवाद साधतना, खेळणी उद्योगावर भाष्य केले. भारताला खेळणी उद्योगातील प्रमुख ठिकाण बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, आता सर्वांसाठी लोक खेळण्यांसाठी व्होकल होण्याची वेळ आली असल्याचेही सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नीट आणि जेईई परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांशी चर्चा करा आणि त्यांनी सहमती दर्शवल्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा असा सल्ला केंद्र सरकारला या अगोदर दिलेला आहे. सरकारने सर्व पक्षांशी चर्चा करत उपाय शोधला पाहिजे असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं होतं. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं होतं. तसेच, तुम्ही आधीच करायचं तेवढं नुकसान केलं आहे. आता तरी देशातील विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐका अशी विनंतीही त्यांनी सरकारला केली होती.

तर, देशासह राज्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, अशा परिस्थितीत परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो, अशी भूमिका घेत विरोधी पक्षांची सरकारं असलेल्या राज्य सरकारांनी नीट व जेईई परीक्षा घेण्यास विरोध केलेला आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी या राज्यांनी केली आहे. तसेच, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे.