भारताचा डावखुरा तडाखेबंद फलंदाज सुरेश रैनाने काश्मीर प्रश्नी केलेल्या टि्वटला एक भावनिक किनार आहे. फार कमी जणांना माहिती असेल सुरेश रैना मूळचा काश्मिरी पंडित आहे. श्रीनगरमधील रैनावरी हे त्याचे मूळ गाव. सुरेश रैनाचे वडिल त्रिलोकचंद रैना निवृत्त सैन्य अधिकारी आहेत. काश्मिरी पंडित कुटुंबात जन्मलेला रैनाला तीन भाऊ आणि एक बहिण आहे. ८०-९० च्या दशकात काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांवर अत्याचार सुरु होते. त्यावेळी त्रिलोकचंद यांचे कुटुंब उत्तर प्रदेशात गाझियाबादमध्ये स्थायिक झाले.

त्यानंतर रैना क्रिकेट खेळण्यासाठी लखनऊला आला. उत्तर प्रदेशच्या रणजी संघात दमदार कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळाली. २०११ साली भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर जम्मू-काश्मीरचे तत्कालिन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्याला जम्मू-काश्मीरच्या रणजी संघाकडून क्रिकेट खेळण्याचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे काश्मीर रैनासाठी अत्यंत जिव्हाळयाचा विषय आहे.

मागच्यावर्षी भारताने ७१ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. पण त्यावेळी काश्मीमरमध्ये काही भागात कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी निर्बंध होते. त्यावेळी एका काश्मिरी पंडित महिलेने लाल चौकात जाऊन ‘भारत माता की जय’ असे नारे दिले होते. त्यावेळी रैनाने तो व्हिडिओ टि्वट करताना त्या शूर महिलेला सलाम असे कॅप्शन लिहिले होते. एकूणच काश्मीर रैनासाठी जिव्हाळयाचा विषय आहे.