अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) हस्तांतरित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मंजुरी दिली. या निकालानंतर  हा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करणारे भाजपाचे खासदास सुब्रमण्यम स्वामी यांनी आणखीन एक वक्तव्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या स्वामी यांनी सुशांतच्या मृत्यूचे दुबईमधील काही व्यक्तींशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. दुबईमध्ये बसलेले पैशांचा काळाबाजार करणारे (मनी लॉन्डरर्स) आणि सुपाऱ्या घेऊन हत्या करणाऱ्यांचा (प्रोफेश्नल किलर्स) या प्रकरणामध्ये सहभाग असू शकतो. त्यांचा हा प्रकरणात सहभाग असल्याची शक्यता नाकारता येणार नाही असं मत स्वामी यांनी व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या निर्णयावर सुब्रमण्यम स्वामींची तीन शब्दात प्रतिक्रिया; तासाभरात १७ हजार शेअर्स

टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीशी बोलताना स्वामी यांनी प्रत्येक गुन्ह्यामध्ये काही ना काही पुरावा असतोच असं मत व्यक्त केलं. तसेच या गुन्ह्याच्या तपासामध्ये अनेक चूका झाल्याची टीकाही स्वामी यांनी केली आहे. याचवेळी बोलताना त्यांनी सुशांतच्या हत्येचा दुबईतील काही व्यक्तींशी संबंध असू शकतो अशी शक्यता बोलून दाखवली. यापूर्वी १६ ऑगस्ट रोजी स्वामी यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे असं मत व्यक्त केलं होतं. स्वामी यांच्याबरोबरच भारतीय गुप्तहेर संस्था ‘रॉ’चे (रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग) माजी अधिकारी एन. के. सूद यांनाही सुशांत प्रकरणाचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. अंडरवर्ल्डमधील गुन्हेगार हे अगदी चालाख असतात. ते त्यांचं काम करतात आणि नंतर लक्ष इतर गोष्टींकडे वळवण्याचा प्रयत्न करतात असं सूद म्हणाले.

दुबई कनेक्शन संदर्भात थेट मोदींना लिहिलं होतं पत्र

यापूर्वीही स्वामी यांनी जुलै महिन्यामध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून या प्रकरणाचा दुबईमधील व्यक्तींशी संबंध असल्याबद्दलची शक्यता व्यक्त करत सीबीआय़ चौकशीची मागणी केली होती. पत्रात सुब्रहमण्यम स्वामी यांनी मुंबईतील आपल्या सुत्रांकडून सुशांतचा मृत्यू आत्महत्या दाखवत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला होता. तसंच बॉलिवूडमधील अनेक मोठे सेलिब्रेटी दुबईमधील डॉनच्या मदतीने मुंबई पोलिसांना प्रकरण मिटवायला सांगत, ही ऐच्छिक आत्महत्या असल्याचं दाखवण्यास सांगत आहेत असंही त्यांनी या पत्रात म्हटलं होतं. “तुम्हाला सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची कल्पना आहेच. माझे सहकारी इशकराम भंडारी यांनी सुशांत सिंहच्या कथित आत्महत्येच्या परिस्थितीसंबंधी रिसर्च केला आहे. पोलीस एफआयआर दाखल केल्यानंतर सुशांत सिंहने कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली याचा तपास करत आहेत. पण मुंबईतील माझ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं ज्यांचे दुबईतील डॉनशी संबंध आहेत ते पोलिसांकडून ही ऐच्छिक आत्महत्या होती हे दाखवण्यासाठी मदत मागत आहेत,” असं स्वामी यांनी पत्रात नमूद केलं होतं.

नक्की वाचा >> सुशांत सिंह मृत्यू प्रकरण : सीबीआयला शोधावी लागणार या १५ प्रश्नांची उत्तरं


मुंबई पोलीस सध्या करोनाच्या जबाबदारीमुळे व्यस्त असल्याने हा तपास सीबीआयकडे द्यावा असं ही ते या पत्रात म्हणाले होते. दरम्यान हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर आजपासून मुंबईमध्ये सीबीआयच्या टीमने चौकशी सुरु केली आहे. आज सुशांतच्या घरी काम करणाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे.