दलित असल्याच्या कारणावरून एका महिला आमदाराला गणेश मंडपात प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. वुंदावली श्रीदेवी असे प्रवेश नाकारण्यात आलेल्या आमदाराचे नाव आहे.

वुंदावली श्रीदेवी या वायएसआर काँग्रेसच्या महिला आमदार आहेत. श्रीदेवी या मागास जातीतून येतात. गणपती आगमनानिमित्त श्रीदेवी या गुंटूर जिल्ह्यातील अंनथवरम येथील गणपतीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. मात्र, “त्या मागास जातीतील आहे. त्यांनी गणेश पूजेत सहभाग घेतला तर गणेश अपवित्र होईल”, असे सांगत टीडीपीच्या (तेलगू देसम पार्टी) स्थानिक नेत्यांनी श्रीदेवी यांना गणेश मंडपात प्रवेश करण्यापासून रोखले. तरीही श्रीदेवी यांनी मंडपात जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घटनास्थळी बराच गदारोळ झाला. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर आमदार वुंदावली श्रीदेवी या आल्या तशाच परत गेल्या. मात्र, त्यानंतर टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. वाद चिघळल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी श्रीदेवी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनी या घटनेचा निषेध करत गावात निदर्शने केली.