आयसिसने जबाबदारी स्वीकारली

बांगलादेशातील एका शिया मशिदीतील भाविकांवर गुरुवारी अंदाधुंद करून एकाचा बळी घेणाऱ्या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे. यामुळे बांगलादेशात आयसिस या संघटनेचे अस्तित्व नसल्याच्या सरकारचा दाव्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
हा हल्ला आपण केल्याचा दावा इस्लामिक स्टेट गटाने ट्विटरवर टाकलेल्या एका संदेशात केला असल्याचे जिहादी कारवायांवर लक्ष ठेवून असलेल्या अमेरिकेतील ‘साइट’ या गुप्तचर गटाने म्हटले आहे.
देशाच्या वायव्येकडील बोगरा जिल्ह्य़ाच्या शिवगंज भागातील शिया मशिदीत गुरुवारी सायंकाळची प्रार्थना सुरू असताना तीन बंदूकधारी आत शिरले आणि त्यांनी भाविकांवर मशीनगन्सनी गोळीबार केला. यात अजान देणारा ७० वर्षांचा मुअझ्झन हा इसम ठार झाला, तर इमामासह तिघे जखमी झाले.
बंदूकधाऱ्यांनी नंतर मशिदीच्या फाटकाला आतून कुलूप लावले व ते भिंत ओलांडून पळून गेले. या हल्ल्यानंतर पोलिसांनी छापासत्र सुरू केले व शुक्रवारी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या दोघांची नावे अन्वर हुसेन व ज्युएल अशी असल्याचे ‘डेली स्टार’ वृत्तपत्राने एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे.
देशातील अल्पसंख्याक शिया मुस्लीम समुदायावर झालेला हा दुसरा हल्ला आहे. २४ ऑक्टोबरला राजधानी ढाक्यात शियांच्या
एका मिरवणुकीवर झालेल्या बाँबहल्ल्यात दोन जण ठार,
तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्याचा
सूत्रधार अल बानी याला गुरुवारी ठार मारले.
बांगलादेशात विदेशी लोक व निधर्मी ब्लॉगर्स यांच्यावरील हल्ल्यांसह हिंसक घटना वाढल्या आहेत. त्या आयसिस घडवून आणत असल्याचा दावा सरकारने नाकारला असून, स्थानिक कट्टर इस्लामी गटांनी त्या घडवल्याचे म्हटले आहे.