जनमत चाचण्यांचे स्पष्ट संकेत
अमेरिकेत प्राथमिक लढती संपण्याच्या मार्गावर असताना नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदाची लढत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प व डेमोक्रॅटिकच्या हिलरी क्लिंटन यांच्यात होण्याची शक्यता जाहीर करण्यात आली आहे. ओबामा यांच्यानंतर आता व्हाईट हाऊसचा दावेदार कोण हे नोव्हेंबरमध्ये ठरणार आहे. शिवाय देशाला पहिली महिला अध्यक्ष मिळणार का, याचीही उत्सुकता आहे. क्लिंटन व ट्रम्प हे दोघेही न्यूयॉर्कचे आहेत. क्लिंटन या माजी परराष्ट्र मंत्री असून डोनाल्ड ट्रम्प हे अब्जाधीश व स्थावर मालमत्ता सम्राट आहेत. इंडियानातील प्राथमिक लढतीपूर्वी राजकीय निरीक्षकांनी असे सांगितले आहे, की डेमोक्रॅट्कि पक्षाची उमेदवारी क्लिंटन यांना, तर रिपब्लिकनची ट्रम्प यांना मिळेल. सीएनएनच्या जनमत चाचणीतही हाच सूर व्यक्त झाला आहे. ट्रम्प यांना रिपब्लिकनची उमेदवारी मिळेल असे ८४ टक्के जणांनी म्हटले असून डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी क्लिंटन यांना मिळेल असे ८५ टक्के लोकांनी म्हटले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या ५१ टक्के मतदारांनी क्लिंटन यांना पसंती दिली, तर रिपब्लिकन पक्षाच्या ४९ टक्के मतदारांनी ट्रम्प यांना पसंती दिली आहे. मायक्रोसॉफ्टच्या बिंग या सर्च इंजिनच्या माहितीनुसार ट्रम्प यांना उमेदवारीसाठी १३६६ मते पडतील; किमान १२३७ मते त्यासाठी आवश्यक असतात. क्लिंटन यांना २६७६ मते मिळतील.