CAA ला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे या कायद्याला घाबरण्याचं काहीही कारण नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली येथे सांगितलं आहे. तसंच राज्याच्या विकासावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. CAA, NPR, NRC या मुद्द्यांवरही चर्चा झाली. तसेच महाराष्ट्रातल्या इतरही प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्राला केंद्राच्या सहकार्याची गरज आहे असंही उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं. मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच दिल्लीत आलो आहोत. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये कोणताही वाद नाही असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

“सीएए, एनपीआर, एनआरसीच्या मुद्द्यांवर पंतप्रधानांसोबत माझी चर्चा झाली. या मुद्द्यांवर यापूर्वीच मी माझी भूमिका सामना मध्ये मांडली आहे. सीएएला घाबरण्याचं काहीही कारण नाही. हा कायदा कुणालाही देशातून काढण्यासाठीचा कायदा नाही. एनआरसीबाबत जे वातावरण तयार केलं जातं आहे की मुस्लिमांनाच त्रास होणार ते चुकीचं आहे. सगळ्यांनाच आपल्या नागरिकत्वासाठी रांगेत उभं रहावं लागणार आहे. या मुद्द्यावरुन ज्यांनी आंदोलन भडकवलं आहे त्यांनी कायदा आणि इतर गोष्टी समजून घ्यायला हव्यात” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.