असहिष्णू भारतीयांना भारतात जागा नाही, अशा शब्दांमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रामजस महाविद्यालयातील हिंसक घटनांवर भाष्य केले आहे. विद्यापीठात तर्कसंगत चर्चा आणि वादविवाद व्हावेत. मात्र त्यामुळे अस्वस्थता आणि अशांतता पसरणार नाही, याची काळजी घेतली जावी, असे म्हणत राष्ट्रपतींनी विद्यापीठांमधील परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

केरळमधील कोची येथे ‘इंडिया अॅट ७०’ व्याख्यान देताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशातील सद्यस्थितीवर भाष्य केले. ‘भारत हा कायमच विचार, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा देश राहिला आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा भारतीय घटनेने नागरिकांना दिलेला एक महत्त्वपूर्ण अधिकार आहे,’ अशा शब्दांमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशातील सद्याच्या स्थितीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘राष्ट्रीय उद्देश आणि राष्ट्रभक्ती यांचा नव्याने शोध घेण्याची वेळ आली आहे,’ असे म्हणत ‘देशाचा आणि देशातील नागरिकांचा विचार प्राधान्याने व्हायला हवा,’ असे आवाहन केले. ‘देशात कोणत्याही मुद्यावर टीका आणि सहमतीसाठी जागा उपलब्ध असायला हवी. जेव्हा एका महिलेला क्रूरपणे वागवले जाते, तेव्हा आपण आपल्या संस्कृतीच्या आत्म्याला यातना देत असतो. मुले आणि महिलांबद्दल अशा प्रकारचा विचार करणाऱ्यांविरोधातच कोणत्याही समाजाची परीक्षा होत असते,’ असे प्रतिपादन राष्ट्रपतींनी केले.

‘आपल्याला सामूहिकपणे देशभक्ती आणि राष्ट्रीय उद्दिष्टांचा विचार करायला हवा. यासाठी आपल्याला सामूहिकपणे काम करण्याची आवश्यकता आहे,’ असे विचार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मांडले. देशभरातील महाविद्यालयांमध्ये घडणाऱ्या घटनांबद्दल प्रणव मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली.