देशभरात करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून भारतात दिवसाला ३ लाखांच्या वर नवे करोनाबाधित सापडत आहेत. त्यासोबतच मृतांचा आकडा देखील सातत्याने ३५०० च्या वर राहिला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येऊ लागला असून अपुऱ्या ऑक्सिजनमुळे रुग्णांचे प्राण गेल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत. त्यातच आता केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी देशात करोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा दिला आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देशातील करोनाची सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील परिस्थिती याविषयी माहिती दिली. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था अजून सक्षम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

तिसरी लाट अटळ, पण…!

केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यावर भाष्य केलं आहे. “भारतात करोनाची तिसरी लाट येणं अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि करोनाचा वेगाने होणारा प्रसार पाहाता ते होणार आहे. पण फक्त ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणं कठीण आहे. आपण या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवं”, असं ते म्हणाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये भारतात ३ लाख ८२ हजार ३१५ नवे करोनाबाधित सापडले असून ३ हजार ७८० करोना रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे.

 

‘सीरम’ ब्रिटनमध्ये करणार २५०० कोटींची गुंतवणूक

भारतातील लसी प्रभावी

दरम्यान, भारतात सध्या दिल्या जाणाऱ्या लसी करोनाच्या सध्याच्या स्ट्रेनवर परिणामकारक असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. तसेच, करोनाचे नवे प्रकार जगभरात जसे आढळून येतील, तसेच ते भारतात देखील सापडणार आहेत, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. भारतात सध्या सीरम इन्स्टिट्युटने उत्पादित केलेली कोविशिल्ड आणि भारत बायोटेकने तयार केलेली कोवॅक्सिन या दोन लसींचे डोस दिले जात आहेत.

काय सांगते देशातली आकडेवारी?

देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. आज सकाळी पूर्ण झालेल्या २४ तासात देशात ३ लाख ८२ हजार ३१५ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. कालच्या तुलनेत या संख्येत थोडी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता बाधितांची एकूण संख्या २ कोटी ६ लाख ६५ हजार १४८ वर पोहोचली आहे. नव्या बाधितांसोबतच मृतांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येते. गेल्या २४ तासात ३७८० मृतांची नोंद झाली. त्यामुळे आता मृतांचा आकडा २ लाख २६ हजार १८८ वर पोहोचली आहे. तर देशातला मृत्युदर १.०९ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात सध्या ३४ लाख ८७ हजार २२९ रुग्ण उपचाराधीन आहेत. काल दिवसभरात ३ लाख ३८ हजार ४३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर आता देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.०३ टक्क्यांवर पोहोचले आहे.