प्रेमाची भाषा मुक्या जनावरांनाही कळते असे म्हटले जाते. त्यांच्यावर आपण जीव लावला तर ते देखील आपल्यावर प्रेम करतात, हे अनेकदा सिद्धही झालंय. मात्र, याच्या उलट एक खळबळजनक घटना अमेरिकेत घडली आहे. या घटनेमध्ये श्वानप्रेमी असलेल्या एका व्यक्तीला चक्क त्याच्या १८ पाळीव कुत्र्यांनीच ठार मारले आणि त्याचा फडशाही पाडला.

इंडिया टुडेने दिलेल्या वृ्त्तानुसार, अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील ही घटना असून फ्रेडी मॅक नामक एक ५७ वर्षीय व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेत असताना एक धक्कादायक बाब पोलिसांसमोर आली. ती म्हणजे श्वानप्रेमी असलेल्या मॅकच्या विविध जातीच्या १८ पाळीव कुत्र्यांनीच त्याच्या शरीराचा फडशा पाडला होता. मॅकच्या मृत शरीराचे मांस, हाडं, केस इतकेच नव्हे कपडेही या कुत्र्यांनी खाऊन टाकले होते. मॅकच्या शरीरातील केवळ २ ते ५ इंचाची काही हाडेच त्यांनी शिल्लक ठेवली होती.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या जॉन्सन काऊंटी शेरीफ ऑफिसचे डेप्युटी आरोन पीट्स यांनी सांगितले की, मानवाच्या संपूर्ण शरीराचा एखाद्या प्राण्याने पूर्णपणे फडशा पाडल्याचे आपण कधीही ऐकलं नसेल. मात्र, बेपत्ता मॅकच्या बाबत हे सत्य असून त्याची हाडंही त्याच्या पाळीव कुत्र्यांनी शिल्लक ठेवली नाहीत. पीट्स म्हणाले, मॅक गंभीर आजाराने ग्रस्त होता, त्यामुळे त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाचा कुत्र्यांनी फडशा पाडला की थेट त्याच्या कुत्र्यांनीच आपल्या मालकाला ठार मारले हे अद्याप कळू शकलेले नाही.

टेक्सास : श्वानप्रेमी फ्रेडी मॅकचा त्याच्या पाळीव कुत्र्यांनीच या राहत्या ठिकाणी फडशा पाडला.

—————————————————————————————————————–

फ्रेडी मॅक हा एप्रिल महिन्यापासून बेपत्ता होता. याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तो राहत असलेले घर अक्षरशः पिंजून काढले. दरम्यान, त्याच्या घराबाहेर मोठे गवत वाढलेले होते त्यात पोलिसांना प्राण्यांनी फडशा पाडलेल्या अवस्थेत मानवी केस, कपडे आणि हाडं आढळून आली. या सर्व अवशेषांची न्यायवैद्यक तपासणी केल्यानंतर त्याचे डीएनए हे मॅकच्या कुटुंबियांशी जुळले, त्यावरुन या धक्कादायक घटनेचा उलगडा झाला.