केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. केंद्र सरकारच्या योजना पश्चिम बंगालमध्ये लागू केल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अमित शाह यांच्या टीकेला तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी उत्तर दिलं असून पश्चिम बंगालला गरज होती तेव्हा कुठे होतात अशी विचारणा केली आहे. फक्त बोलणारे आणि काही काम न करणारे चॅम्पियन असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.

नुसरत जहाँ यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “फक्त बोलणारे आणि काही काम न करणारे चॅम्पियन परतले आहेत. आम्हाला अम्फान वादळ आणि करोनाशी लढण्यासाठी केंद्राची मदत हवी होती तेव्हा तुम्ही कुठे होतात?”.

“२०१४ मध्ये अच्छे दिनचं आश्वासन देण्यात आलं होतं. यानंतर नोटाबंदी, वाढती महागाई, बेरोजगारी, एनआरसी, सीएए, बेजबाबदरीने हाताळलेली करोना परिस्थिती, दुर्लक्षित मजूर या गोष्टी समोर आल्या. बंगालमधील लोक तुमच्या जाळ्यात अडकायला काही आंधळे नाहीत,” असंही नुसरत जहाँ यांनी म्हटलं आहे.

अमित शाह यांनी आज पश्चिम बंगालमधील जनतेला व्हर्च्युअल रॅलीद्वारे संबोधित केलं. यावेळी त्यांनी टीका करताना म्हटलं की, “केंद्र सरकारची चांगली आयुष्यमान भारत योजना आजही पश्चिम बंगालमध्ये लागू नाही. अन्य सर्व राज्यांनी ही योजना लागू केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील दिल्लीमध्ये ही योजना लागू केली. परंतु ममता बॅनर्जी ही योजना पश्चिम बंगालमध्ये लागू करत नाहीत. त्या ही योजना का लागू करत नाहीत हे आम्हाला आणि पश्चिम बंगालच्या जनतेला ऐकायचं आहे. अशा बाबींमध्ये राजकारण करू नये. परंतु याव्यतिरिक्त राजकारण करायचं असेल तर तुम्हीच मैदान ठरवा त्या ठिकाणी दोन हात होऊन जाऊ दे,”

आणखी वाचा- “राजकारणासाठी मैदान तुम्ही ठरवा, दोन हात होऊन जाऊ द्या”

“नरेंद्र मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाले. २०१९ पर्यंत त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर दुसऱ्या कार्यकाळाचं एक वर्ष पूर्ण झालं. त्यांनी देशाला सन्मान मिळवून दिला. सहा वर्षांमध्ये नव्या भारताची पाया रचला. परंतु ममता बॅनर्जी तुम्ही गेल्या १० वर्षांचा हिशोब द्या. बॉम्बस्फोट आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या मृत्यूचा आकडा सांगू नका. यावेळी पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन नक्की होणार,” असा विश्वासही शाह यांनी यानिमित्तानं व्यक्त केला.