तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांच्याविरोधात दारुल उलूम देवबंदनं फतवा जारी केल्याचं वृत्त होतं. या फतव्यावर नुसरत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘मला माझा धर्म माहीत आहे. मी जन्मापासूनच मुस्लीम आहे आणि आताही मुस्लीमच आहे,’ अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

हिंदू व्यक्तीशी लग्न केल्याने आणि गळ्यात मंगळसूत्र व कपाळावर सिंदूर लावून संसदेत हजर झालेल्या नुसरत जहाँ यांच्याविरोधात दारूल उलूम देवबंद या संघटनेने फतवा जारी केला होता. यावर नुसरत म्हणाल्या, ‘मी निराधार गोष्टींकडे लक्ष देत नाही. मला माझा धर्म माहीत आहे. मी जन्मापासूनच मुस्लीम आहे आणि आताही मुस्लीमच आहे. हा आस्थेचा विषय आहे. ही आस्था किंवा धर्माबाबतचा विश्वास हा तुमच्या हृदयात असावा लागतो, डोक्यात नाही.’

दारुलच्या भूमिकेवर नुसरत यांनी याआधी ट्विटरच्या माध्यमातूनही टीका केली होती. ‘मी जात, पंथ आणि धर्माच्या पलिकडे सर्वसमावेशक विचाराच्या भारताचं प्रतिनिधित्व करते. मी सर्व धर्मांचा आदर करते. यापुढेही मी मुस्लिमच राहीन आणि इतर कोणालाही मी काय परिधान करावं याची निवड करण्याचा अधिकार नाही. धर्मावरील विश्वास हा तुमच्या वेशावरून ठरत नाही’, असं ट्विट नुसरत यांनी केलं होतं.

नुसरत जहाँ या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या बशीरहाट मतदार संघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. संसदेत शपथविधीवेळी नुसरत या कपाळावर सिंदुर आणि साडी परिधान करून आल्या होत्या. यावर दारुल उलूमनं आक्षेप घेतला आहे. यासोबतच नुसरत यांनी मुस्लिमेतर व्यक्तीशी लग्न करणं हे इस्लामला मान्य नाही, असं सांगत दारुल उलूमनं नुसरत यांच्याविरोधात फतवा जारी केला आहे.