राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भाजपा व काँग्रेस मिझोरममध्ये एकत्र आले आहेत. मिझोरममधील चकमा स्वायत्त जिल्हा परिषदेत सत्तेसाठी भाजपा व काँग्रेस यांनी हातमिळवणी केली आहे. स्वायत्त परिषदेच्या २० जागांपैकी काँग्रेसला सहा तर भाजपला पाच जागा मिळाल्या आहेत. तर मिझो नॅशनल फ्रंटने आठ जागा मिळवल्या. त्यामुळे निकालानंतर काँग्रेस व भाजपाने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे क्रीडामंत्री व काँग्रेस नेते झोडिंतुलंगा यांनी दिली. business-standard.com ने याबाबत वृत्त दिलं आहे.

या युतीचा परिणाम राष्ट्रीय स्तरावर किंवा आगामी विधानसभा निवडणुकीवर होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य भाजपा नेतृत्व मात्र या आघाडीबाबत नाराज आहे. काँग्रेसबरोबर आघाडी करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांवर भाजपा कारवाई करेल, असे संकेत पक्ष सूत्रांनी दिले आहेत. याबाबत पक्षनेतृत्व दिल्ली किंवा गुवाहाटीहून आदेशाची प्रतीक्षा असल्याचे भाजपाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. देशपातळीवरील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत भाजपाच्या सांती जीवन चकमा यांची नेतेपदी तर काँग्रेसच्या बुधलिया चकमा यांची उपनेते म्हणून निवड केली.