देशात रोजच्या करोनाबाधितांचा आलेख घसरणीला लागला आहे. गेल्या २४ तासांमध्ये ५५ हजार ३४२ रुग्ण आढळले असून, दोन महिन्यांतील हा नीचांक आहे.

देशात गेल्या सलग पाच दिवसांपासून रोज ७५ हजारांहून कमी रुग्ण नोंदविण्यात येत असून, सलग दहा दिवसांपासून एक हजारांहून कमी करोनाबळींची नोंद होत आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या ७१,७५,८८० तर करोनाबळींची एकूण संख्या १,०९,८५६ झाली आहे.

देशात १७ सप्टेंबरला सर्वाधिक ९७,८९४ रुग्ण आढळले होते. गेल्या काही दिवसांपासून मात्र रोजच्या करोनाबाधितांच्या संख्येत घट नोंदविण्यात येत आहे.

गेल्या २४ तासांमध्ये ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला. ही संख्या जुलैनंतरची सर्वात कमी आहे. दिवसभरात ७७ हजार ७६० रुग्ण करोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ लाख २७ हजार झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ८,३८,७२९ आहे. सप्टेंबरमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या १० लाखांवर होती, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

‘हिवाळ्यात दक्षता घ्या’

थंडीच्या दिवसांत श्वसनाचे आजार वाढतात. करोनाचा विषाणू प्रामुख्याने श्वसन यंत्रणेला बाधित करतो. शिवाय, डेंग्यू, मलेरिया, फ्लू, चिकन गुनिया, लेप्टोस्पायरोसिस आदी आजारांचा  प्रादुर्भाव झाला तर करोना रुग्णांचे योग्य निदान करणे कठीण होते. त्यामुळे हिवाळ्यात लोकांनी स्वत:चा करोनापासून बचाव केला पाहिजे. सणासुदीचेही दिवस सुरू होत असून उत्सवांमध्ये लोक एकत्र येतात तेव्हा करोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वेगाने होण्याचा धोका आहे. अमेरिका, युरोपमध्ये पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. भारतात पुन्हा रुग्णवाढीला गती मिळू नये यासाठी दक्ष राहिले पाहिजे, असा सल्ला निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिला. हिवाळ्यात अन्य साथीचे रोग आणि करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात केंद्राने राज्यांना सूचना पाठवल्या आहेत.

‘पुनर्बाधित’साठी १०० दिवस

पुन्हा करोनाबाधित होणारे दोन रुग्ण आढळले असून त्यात मुंबई व अहमदाबादमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जगभरात असे २४ रुग्ण आढळले आहेत. करोनामुक्त झालेल्या रुग्णाला ९० वा १०० दिवसांनंतर पुन्हा बाधा झाली तर पुनर्बाधित म्हणता येईल. प्रतिपिंड तीन-चार महिने शरीरात राहतात, असे अनुमान असल्याने १०० दिवसांचा मध्यंतराचा काळ धरता येऊ शकेल, असे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे महासंचालक बलराम बार्गव यांनी सांगितले.