तीन दिवसांच्या धुमश्चक्रीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा, गुप्तचरांच्या सूचनांआधीच दहशतवादी घुसल्याचे निष्पन्न
पंजाबमधील पठाणकोट येथे भारतीय हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यानंतरची चकमक अजून सुरूच असून लपून बसलेले दोन दहशतवादी सोमवारी मारले गेले, त्यामुळे या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या आता सहा झाली आहे. गुप्तचरांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्याच्या आधीच दहशतवादी या हवाई तळावर घुसले होते असे आता तपासात निष्पन्न होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पठाणकोट येथील स्थितीचा उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. पुढील आठवडय़ात होणाऱ्या भारत-पाकिस्तान या उभय देशांच्या सचिव पातळीवरील चर्चेत या हल्ल्यामुळे विघ्ने निर्माण झाली आहेत.
हवाईतळाच्या मागील बाजूस घनदाट जंगल असून तेथून हे दहशतवादी घुसले होते, त्यामुळे त्यांचा माग काढणे कठीण जात आहे. जवानांचे राहण्याचे ठिकाण असलेल्या इमारतीत दोन दहशतवादी मारले गेले, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
मोहिमेस विलंब का?
मोहीम लांबल्याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. पंतप्रधान मोदी व संरक्षण मंत्री र्पीकर यांनी विनाकारण जोखीम पत्करू नका असे आदेश दिले होते. मोहिमेला किती वेळ लागतो हे महत्त्वाचे नाही, तर आपली प्राणहानी कमी झाली पाहिजे व एक तरी दहशतवादी जिवंत मिळाला पाहिजे असा हेतू त्यात आहे. दहशतवाद्यांकडे एके ४७ रायफली , तोफगोळे व ग्रेनेड लाँचर्स, जीपीएस यंत्रणा आहेत. भारत-पाक चर्चा प्रक्रिया हाणून पाडण्यासाठी पठाणकोट व अफगाणिस्तानात हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांपैकी दोन जणांनी गुप्तचरांनी सतर्कता आदेश देण्याच्या आधीच हवाई तळावर प्रवेश केल्याचा अंदाज आहे. पोलिस अधीक्षक सलविंदर सिंग, त्यांचे मित्र राजेश वर्मा व त्यांचा स्वयंपाकी अशा तिघांसह एसयूव्ही वाहनाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. नंतर दहशतवाद्यांनी वर्मा यांचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चार दहशतवादी वाहनात घुसले होते व ते पाकिस्तानातील म्होरक्यांशी बोलत होते. आम्ही मार्गावर आहोत पण हवाई तळावर पोहोचलेलो नाही, कारण पोलिसांचे तपासणी नाके आहेत असे त्यांनी सांगितले होते.

अधिक प्रशिक्षित दहशतवादी
पठाणकोट येथील हल्ल्यातील दहशतवादी प्रशिक्षित होते व त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे व दारूगोळा होता, त्यामुळे हानी पोहोचवण्याची त्यांची क्षमता जास्त होती. ही चकमक त्याचेच निदर्शक असल्याचे मानले जाते. एकातरी दहशतवाद्याला जिवंत पकडण्याचे प्रयत्न आहेत. पहाटे साडेतीन वाजता शिफ्ट बदलत असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यामुळे पाच सुरक्षा जवान मारले गेले.एनएसजीच्या एका लेफ्टनंट कर्नलचा स्फोटके निकामी करताना झालेला मृत्यू दुर्दैवी होता. २००८ च्या मुंबई हल्ल्यापेक्षा आताचे दहशतवादी प्रशिक्षित होते, असे सूत्रांनी सांगितले.

एकूण सहा दहशतवादी
सुरक्षा संस्थांच्या मते एकूण सहा दहशतवादी असावेत व त्यांनी चार व दोनच्या गटात विभागणी केली होती. पठाणकोट हवाई तळावर हल्ला होणार असल्याचा इशारा १ जानेवारीला सुरक्षा दलांना मिळाला होता. नंतर तेथे १६० कमांडोजचे पथक पाठवले होते व इतर दलेही तैनात होती.