सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ‘एसएपी’च्या (साप) दोन कर्मचाऱ्यांना एच १ एन १ अर्थात ‘स्वाईन फ्लू’ची लागण झाली आहे. दोन कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. समोर आलेल्या अहवालातून त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झाले. त्यानंतर कंपनीने मुंबईसह तीन ठिकाणच्या कार्यालयांना सुटी जाहीर केली आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘एसएपी’ (साप) या जर्मनीस्थित कंपनीचे मुंबई, बंगळुरू आणि गुरगाव येथे कार्यालये आहेत. बंगळुरू येथील कंपनीच्या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं समोर आलं. आरोग्य अहवालातून ही माहिती समोर आल्यानंतर कंपनीनं तिन्ही ठिकाणच्या कार्यालये पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात कर्मचाऱ्यांनी घरून काम करण्याच्या सूचना कंपनीनं दिल्या आहेत. कार्यालयाची स्वच्छता करण्यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतला आहे.

आमच्या कर्मचाऱ्याचं आरोग्य हाच आमचा प्राधान्यक्रम आहे. स्वाईन फ्लू प्रार्दूभाव रोखण्यासाठी आम्ही आवश्यक ती माहिती देत आहोत. खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीची मुंबई, बंगळुरू आणि गुरगाव येथील कार्यालये पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याला सर्दी, खोकला अथवा ताप येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या,” असं कंपनीनं कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटलं आहे.

ही आहेत स्वाइन फ्लूची लक्षणे –

सर्वसामान्यत: स्वाइन फ्लू हा आजार किरकोळ सर्दी-खोकल्याचा आजार आहे. तीव्र ताप, कोरडा खोकला, नाकातून पाणी वाहणे, शिंका येणे, घशामध्ये खवखव होणे, थकवा आणि काही वेळेस जुलाब किंवा पोटदुखी अशी लक्षणे या आजारात दिसतात. सर्वसाधारणपणे चार ते पाच दिवसांत हा आजार बहुसंख्य लोकांमध्ये स्वत:हूनच बरा होतो. काहीच व्यक्तींमध्ये हा उग्र स्वरूप धारण करतो. गुंतागुंतीच्या आजारात मात्र काही विशिष्ट लक्षणे दिसतात. याला सूचक किंवा धोकादायक लक्षणे म्हणतात. यात छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, दम लागणे, अतितीव्र ताप, शुष्कता (डिहायड्रेशन), बेशुद्धावस्था ही लक्षणे दिसायला लागतात.