भारतीय सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा कमांडर जुनैद मट्टूसमवेत २ अतिरेकी ठार झाले. दक्षिण काश्मीरमधील बिजबहेडा परिसरातील एका गावांत सुरक्षा दलांनी सकाळी ८ वाजता लष्करचा कमांडर जुनैद आणि त्याच्या साथीदारांना एका घरात घेरले. या वेळी झालेल्या चकमकीत जुनैद मट्टू आणि त्याचा एक सहकारी ठार झाला. जुनैदवर ५ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
Two terrorists including Lashkar Commander Junaid Mattoo have been eliminated in the Kulgam encounter by Indian Army, SoG and CRPF. pic.twitter.com/ikCblNx3V4
— ANI (@ANI) June 16, 2017
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका घरात ३ दहशतवादी आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सैन्य दलासह सुरक्षा दलांनी अरवानी गावातील मलिक गल्लीतील एका घराला घेरले. सकाळी ८ च्या सुमारास या घराला सुरक्षादलांनी घेरले. दोन तास त्यांनी वाट पाहिली. सकाळी १० वाजता घरातून पहिल्यांदा गोळीबार करण्यात आला. याचदरम्यान काही ग्रामस्थांनी सुरक्षा दलावर दगडफेक करण्यास सुरूवात करून या ऑपरेशनमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. बाधा आणणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी पॅलेट गनचा वापर करण्यात आला. त्यामुळे ५ व्यक्तींना पॅलेट गनचे छर्रे लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वी मागील महिन्यात सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सबझार अहमद बटला कंठस्नान घातले होते. सबझारने बुरहान वानीची जागा घेतली होती. गतवर्षी सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत वानी ठार झाला होता.
कोण होता जुनैद मट्टू
दक्षिण काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख जुनैद मट्टू कुलगाममधील खुदवानी गावचा तो रहिवासी होता. तो ३ जून २०१५ मध्ये संघटनेत भरती झाला होता. जुनैद उच्च शिक्षित होता. त्याला तंत्रज्ञानाचेही चांगले ज्ञान होते. गतवर्षी जून महिन्यात दहशतवाद्यांच्या एका गटाने अनंतनाग पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. त्यावेळी जुनैद चर्चेत आला होता. त्याचबरोबर त्यावेळी बीएसफच्या बसवर झालेल्या हल्ल्यातही तो सामील होता. जुनैदने जून २०१६ मध्ये अनंतनागमधील एका वर्दळीच्या बस स्थानकावर दिवसाढवळ्या २ पोलिसांची हत्या केली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचे हे कृत्य कैद झाले होते.