आंबोलीच्या कावळेसाद येथे सोमवारी दरीत कोसळून दोन तरूणांचा मृत्यू झाला होता. सुरूवातीला सेल्फी काढण्याच्या नादात हे तरूण दरीत कोसळल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये हे तरूण सेल्फी काढताना नव्हे तर दारूच्या नशेत साहस करायला गेल्यामुळे दरीत कोसळल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे इतक्या टोकाची कृती करत असतानाही इतरांनी त्यांना रोखण्यापेक्षा त्यांचा व्हिडिओ काढण्यात धन्यता मानली.

दारूच्या नशेत या तरूणांना एका जागेवर धड उभेही राहता येत नव्हते. अशावेळी इतर जण केवळ मजामस्ती करत मोबाइलवर व्हिडिओ काढत राहिले. एका पर्यटक महिलेच्या किंचाळण्याचा आवाज आल्यानंतर ही घटना उघडकीला आल्याचा दावा सुरूवातीला करण्यात येत होता. यानंतर संबंधित तरूणांच्या मित्रांनी त्यांचा गाडीसह अन्य ठिकाणी शोध घेतला, असे सांगितले जात होते. मात्र, सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहता या दोघांचे मित्र हा प्रकार घडला तेव्हा त्याठिकाणीच उपस्थित होते, असा निष्कर्ष निघत आहे.

आंबोली कावळेसादमध्ये सोमवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला होता. इम्रान गारदी आणि प्रताप राठोड अशी दरीत कोसळलेल्या दोघांची नावे आहेत. दारु प्यायल्यानंतर दोघे जण डोंगराच्या कड्यावर स्टंटबाजी करत होते. या दोघांना स्वत:च्या पायांवर धड उभेही राहता येत नव्हते. त्यात कहर म्हणजे या ठिकाणी सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळीवर चढून दोघेही जण डोंगराच्या टोकावर उभे राहिले. दारूची नशा डोक्यात भिनल्यामुळे त्या ठिकाणीही दोघांनी अतिउत्साहाच्या भरात स्ंटटबाजी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोघांपैकी एकाचा तोल गेला आणि जाता जाता त्याने दुसऱ्यालाही आपल्यासोबत खाली खेचले, असे व्हिडिओत दिसत आहे. दरीत दोघांच्या मृतदेहाचा शोध लागला असून सोमवारपासून हे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, मात्र दाट धुके व पावसामुळे या कार्यात अडथळे येत आहेत.