प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेची घोषणा

१५ हजार रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी तीन हजार रुपयांच्या मासिक निवृत्तीवेतन योजनेची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी हंगामी अर्थसंकल्पात केली. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (पीएमएसवायएम) असे या योजनेचे नाव आहे.

या योजनेची घोषणा करताना अर्थमंत्री गोयल म्हणाले, या योजनेमुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांना वयाच्या साठीनंतर दरमहा तीन हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल. येत्या पाच वर्षांत १० कोटी कामगारांना या योजनेचा लाभ होईल. या योजनेत केंद्र सरकार आणि संबंधित कामगार यांचे मासिक योगदान प्रत्येकी १०० रुपये असेल.

देशाच्या आर्थिक विकासात ४२ कोटी कामगार योगदान देतात. त्यात फेरीवाले, रिक्षाचालक, बांधकाम मजूर यांच्यासह अन्य कामगारांचा समावेश आहे. त्यात घरकामगारांची संख्याही मोठी आहे. आम्ही त्यांना वृद्धत्वासाठी व्यापक सामाजिक संरक्षण दिले पाहिजे. त्यासाठीच या महानिवृत्तीवेतन योजनेचा प्रस्ताव आहे, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.

योजनेची वैशिष्टय़े

  • येत्या पाच वर्षांत १० कोटी कामगारांना लाभ
  • मासिक उत्पन्न १५ हजार रुपये असलेले कामगार योजनेच्या कक्षेत
  • वयाच्या ६० वर्षांनतर दरमहा ३००० रुपये निवृत्ती वेतन
  • अर्थसंकल्पात ५०० कोटींची प्राथमिक तरतूद
  • आवश्यकता भासल्यास आणखी तरतूद करणार
  • चालू वर्षांपासूनच योजनेची अंमलबजावणी