29 September 2020

News Flash

Budget 2019 : ‘दलाल स्ट्रीट’ खुश, मात्र स्वागत सावधगिरीने!

पीयूष गोयल यांनी एक एक घोषणा वाचून दाखवायला सुरुवात करताच सत्ताधारी सदस्यांनी बाक वाजवून प्रतिसाद दिला.

निवडणूक वर्षांत विशेषत: मध्यमवर्गीय पगारदार आणि शेतकऱ्यांच्या मतांवर डोळा ठेवत अंतरीम अर्थसंकल्पाने घोषणांची खैरातीने भांडवली बाजारालाही शुक्रवारी खूश केल्याचे दिसले. या घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर आणि पर्यायाने महागाईपूरक वित्तीय तुटीवर मोठा ताण येणार नाही, याची अर्थमंत्र्यांनी घेतलेली काळजी बाजारासाठी स्वागतार्ह ठरली. मात्र मध्यंतरात ५२१ अंशांपर्यंत उसळलेला ‘सेन्सेक्स’ दिवस सरत असताना, केवळ २१२ अंश वाढीसह स्थिरावणे म्हणजे गुंतवणूकदारवर्गाने हे स्वागतही सावधगिरीने असल्याचेच दर्शविले.

अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली तेव्हा गुरुवारच्या तुलनेत साधारण १३० अंशांच्या वाढीसह सेन्सेक्स ३६,३९० पातळीवर होता. जवळपास तासभर मर्यादित ५० अंशांच्या पट्टय़ात वरखाली हालचालीनंतर, मुख्यत: करविषयक तरतुदींच्या घोषणेनंतर सेन्सेक्सने अकस्मात मोठी उसळी घेतली. सेन्सेक्सने याच सुमारास ३६,७७८ अंशांच्या दिवसातील उच्चांकापर्यंत मजल मारली.

अर्थमंत्र्यांनी ५ लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नांवर संपूर्ण कर सवलत, पगारदारांसाठी प्रमाणित वजावट मर्यादा वाढवून ५० हजारांवर, बँक ठेवींवर करमुक्त व्याज उत्पन्न मर्यादेत वाढीसारख्या केलेल्या घोषणा आणि छोटय़ा शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी देणाऱ्या केलेल्या तरतुदी या एकंदर वस्तू मागणीला चालना देणाऱ्या ठरतील, असा भांडवली बाजाराचा कयास आहे. त्याचे प्रत्यंतर मागणीबाबत संवेदनशील कंपन्यांच्या मूल्यवाढीतून दिसून आले. हीरो मोटोकॉर्प, मारुती सुझूकी, आयशर मोटर्स, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी या आघाडीच्या समभागांचे मूल्य या दरम्यान ७ टक्क्य़ांपर्यंत वाढले.

तथापि व्यक्तिगत करदात्यांसाठी पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील करसवलतीबाबत संभ्रम वाढत गेला तसे त्याचे बाजारात प्रतिबिंब पडताना दिसले. बाजाराचा उत्साही मूड काहीसा नरमला आणि वर चढलेल्या भावात समभागांची विक्री करून नफावसुलीही सुरू झाली. याचा सर्वात मोठा फटका बँकांच्या समभागांना बसताना दिसला. रुपयाच्या विनिमय मूल्यात डॉलरच्या तुलनेत झालेल्या २४ पैशांच्या घसरणीनेही निराशेला बळ दिले. तरीही आर्थिक शिस्तीची कास धरत, २०१९-२० साठी वित्तीय तूट ही सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ३.४ टक्क्य़ांपेक्षा अधिक होणार नाही, या ग्वाहीने बाजारातील सकारात्मकता टिकवून ठेवली.

मोदींचा जयघोष

पीयूष गोयल यांनी एक एक घोषणा वाचून दाखवायला सुरुवात करताच सत्ताधारी सदस्यांनी बाक वाजवून प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांना किमान उत्पन्न, नोकरदारांना पाच लाखांचे उत्पन्न करमुक्त, पेन्शन योजना, संरक्षणासाठीच्या तरतुदीत वाढ अशा घोषणा होत गेला आणि भाजपच्या सदस्यांनी ‘मोदी मोदी’ असा जयघोष केला. आपले कौतुक होत असलेले पाहून मोदींच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. गोयल यांच्या बहुतांश घोषणांवर मोदींनीही बाक वाजवून अनुमोदन केले. विरोधी पक्षाचे सदस्य मात्र शांतपणे पाहात होते. तृणमूल काँग्रेसचे खासदार बॅनर्जी केंद्र सरकारची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करताना दिसले.

आठवलेंचा उत्साह

गोयल यांची घोषणांची आतषबाजी सुरू असताना रामदास आठवले राहुल गांधींना उद्देशून, ‘सुनो राहुलजी’ असे म्हणत गोयल यांच्या भाषणाचा आनंद लुटत होते. गोयल यांनी भाषणाच्या शेवटची कविता वाटून दाखवत असल्याचे सांगताच आठवले बाकावरून उठले आणि गोयल यांना, ‘मी करू का कविता’ असे विचारू लागले अखेर भाजपच्या सदस्यांनी त्यांना कसेबसे आवरले आणि खाली बसवले.

बेरोजगारीचे कात्रण

अर्थमंत्र्यांनी मोदी सरकारच्या धोरणांमुळे आणि योजनांमुळे रोजगारी वाढत असल्याचा दावा केला. दोन कोटी रोजगार निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी बेरोजगारीबाबत वृत्तपत्रात आलेल्या वृत्ताचे कात्रण काढले. गोयल यांचे भाषण सुरू असतानाच सातव गोयल यांच्याकडे गेले आणि त्यांनी ते कात्रण त्यांच्या टेबलवर ठेवले. त्यानंतर ते मोदींकडे वळाले. त्यांनाही सातव यांनी हे कात्रण दिले. या वर्षी बेरोजगारीचे प्रमाण गेल्या ४५ वर्षांत सर्वाधिक असनू ते ६.१ टक्के झाल्याचे वृत्त इंग्रजी वृत्तपत्राने दिले होते. त्याचे केंद्र सरकारकडून खंडन करण्यात आले. मात्र विरोधकांनी बेरोजगारी हा मुद्दा बनवलेला आहे.

मोदींची शाबासकी

पीयूष गोयल यांचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय भाषण होते. भाषण होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेले आणि त्यांनी गोयल यांची पाठ थोपटून शाबासकी दिली. मोदींच्या पाठोपाठ भाजपचे तमाम मंत्री, खासदार यांनी गोयल यांचे अभिनंदन करण्यासाठी गराडा घातला. या गराडय़ात गोयल अर्थसंकल्प ठरावाद्वारे पटलावर ठेवण्याचेच विसरले. लोकसभा अध्यक्षांनी त्यांना आठवण करून दिली. शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गाला खूश करणाऱ्या घोषणा करण्यात आल्यामुळे भाजपच्या खासदारांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसत होता. विरोधी सदस्य कसे गप्प झाले आहेत बघा, असे रवीशंकर प्रसाद सहकाऱ्यांना पुन:पुन्हा सांगत होते. नितीन गडकरी, सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर, निर्मला सीतारामन असे तमाम मंत्री गोयल यांचे कौतुक करत होते.

जेटलींना शुभेच्छा

अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीलाच गोयल यांनी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीबद्दल खेद व्यक्त केला. माझ्यासह सदनातील सर्व सदस्य जेटली लवकरात लवकर बरे व्हावेत सदिच्छा व्यक्त करत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि त्यांनी राष्ट्र सेवेत रुजू व्हावे यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभावे, अशा शुभेच्छा गोयल यांनी दिल्या. जेटली उपचारासाठी अमेरिकेत असल्याने मोदी सरकारच्या अखेरच्या अर्थसंकल्पासाठी ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर केला.

 ‘उरी’चा जोश

‘सर्जिकल स्ट्राइक’वर आधारित ‘उरी’ चित्रपटाचे गोयल सातत्याने कौतुक करत आहेत. अर्थसंकल्पीय भाषणातही चित्रपट क्षेत्रासाठी योजना जाहीर करताना त्यांनी ‘उरी’चा उल्लेख केला. त्यावर सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी ‘हाऊ इज द जोश’ असा नारा देत सभागृह दणाणून टाकले. भारतात चित्रपट करण्यासाठी परदेशी निर्मात्यांना सर्व परवानग्या एकत्रितपणे दिल्या जातात. हीच सुविधा आता देशी निर्मात्यांनाही दिली जाणार आहे. पायरसी रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात येणार असल्याची घोषणाही गोयल यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 12:51 am

Web Title: union budget 2019 key points explained by loksatta economics expert part 4
टॅग Budget 2019
Next Stories
1 Budget 2019 : शिक्षण, संशोधन क्षेत्रासाठी ९३ हजार कोटी रुपयांची तरतूद
2 Budget 2019 : करमुक्तता नव्हे, तर सवलत!
3 राहुल गांधींना प्रभू रामाचा अवतार दाखवणारे पोस्टर्स अज्ञातांनी फाडले
Just Now!
X