अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या सरकारी बंगल्यांचे भाडे थकवल्याची माहिती समोर आली आहे. विजय गोयल, प्रकाश जावडेकर, निर्मला सितारामण, सुषमा स्वराज यांसारख्या दिग्गज नेत्यांनी आपल्या सरकारी बंगल्याचे भाडे थकवले आहे. नगरविकास खात्याकडून माहिती अधिकाराखाली देण्यात आलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे.

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनीदेखील आपल्या सरकारी बंगल्याचे भाडे थकवल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अजित कुमार सिंह यांनी किती मंत्र्यांनी सरकारी बंगल्यांचे भाडे थकवले आहे, याबाबत नगरविकास खात्याकडे माहिती मागवली होती. त्याला दिलेल्या उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. सरकारी बंगल्यांमध्ये वापरण्यात येणारे फर्निचर आणि अन्य वस्तूंची ही थकबाकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मुख्तार अब्बार नक्वी यांनी 1.46 लाख तर जितेंद्र सिंह यांनी 3.18 लाख रूपये थकवले असल्याची माहिती नगरविकास खात्याकडून देण्यात आली. तर निर्मला सितारामण यांच्यावर फेब्रुवारी महिन्यापर्यंत 53,276 रूपये आणि प्रकाश जावडेकर यांची 86,923 रूपयांची थकबाकी आहे. तर केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह यांची 2,88,269 रूपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार थावर चंद गहलोत यांची 14,627 रूपयांची थकबाकी असून सुषमा स्वराज यांच्यावर 98,890 रूपयांची थकबाकी आहे. दरम्यान, ज्या खासदारांनी आणि मंत्र्यांनी थकबाकी भरली आहे त्यांना नो डिमांड सर्टिफिकेटही देण्यात आले आहे. तसेच राजनाथ सिंह, नितीन गडकरी, गिरिराज सिंह, बाबूल सुप्रियो, हर्ष वर्धन, मनोज सिन्हा, नरेंद्र सिंह तोमर, महेश शर्मा, जयंत सिन्हा, रवि शंकर प्रसाद, उमा भारती, स्मृती इराणी यांच्यावर कोणत्याही प्रकारची थकबाकी शिल्लक नसल्याचेही माहिती अधिकारातून समोर आले आहे.