19 October 2019

News Flash

जम्मूपाठोपाठ उत्तर प्रदेशातही पोलिसाची गळा चिरून हत्या

अज्ञात हल्लेखोरांनी पोलीस उप निरीक्षकाची हत्या केल्याचा प्रकार समोर

फोटो सौजन्य एएनआय

जम्मू काश्मीरमध्ये पोलीस अधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच उत्तर प्रदेशातही तशीच घटना घडली आहे. काही अज्ञात हल्लेखोरांनी पोलीस उप निरीक्षक शहजोर सिंह यांचा गळा चिरून त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातल्या बिजनौरमध्ये असलेल्या बालावाली पोलीस ठाण्यात उप निरीक्षक म्हणून शहजोर सिंह कार्यरत होते. मात्र काही समाजकंटकांनी त्यांची गळा चिरून हत्या केली.  एवढंच नाही तर त्यांचा मृतदेह जवळच्याच शेतात फेकला आणि त्यांची बंदुक घेऊन तिथून पोबारा केला. शहजोर सिंह मंडावर पोलीस ठाण्याकडून बालावली पोलीस चौकीकडे जात असताना हा प्रकार घडला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातली बातमी दिली आहे.

शहजोर सिंह यांच्या मृतदेहावर अनेक जखमा आहेत. तसेच त्यांची बोटांवर कापण्याच्या खुणा आहेत. बालावली पोलीस ठाण्यात सिंह हे गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत होते. एका बंद पडलेल्या काचेच्या फॅक्ट्रीजवळ त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याचीही माहितीही मिळते आहे. एका प्रत्यक्षदर्शीने एक मृतदेह शेतात पडला आहे अशी माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर या सगळ्या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तसेच तातडीने पंचनामा केला. एप्रिल-मे महिन्यात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये उत्तरप्रदेशात गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांचा आलेख १९५ टक्क्यांनी वाढला आहे.

शहाजोर सिंह यांची हत्या का करण्यात आली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र पोलिसांवरच्या हल्ल्यांच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्या आहेत. इतकेच नाही तर अत्यंत निर्घुणपणे कायद्याच्या रक्षकांना ठार केले जाते आहे. गेल्याच आठवड्यात जम्मू काश्मीरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला जमावाने ठार केले होते. मशिदीचा फोटो काढत आहेत असा गैरसमज झाल्याने संतप्त जमावाने दगडाने ठेचून मारले होते, त्यानंतर बराच वाद निर्माण झाला होता. तो शांत होतो ना होतो तोच आत्ता उत्तरप्रदेशात पोलिसाला ठार करण्यात आले आहे.

 

 

 

 

First Published on July 1, 2017 12:11 pm

Web Title: up bijnor unidentified assailants killed sub inspector sehroj singh by slitting his throat