उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ २०२२ विधानसभा निवडणूक अयोध्येतून लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक आमदार वेदप्रकाश गुप्ता यांनी योगी आदित्यनाथ यांच्यासाठी आपण मतदारसंघ सोडण्यास तयार असल्याचं सांगितलं असल्याने या चर्चेला उधाण आलं आहे. ही लोकांसाठी अभिमानाची बाब असेल अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मुख्यमंत्र्यांनी अयोध्येतून निवडणूक लढणं आम्हा सर्वांसाठी अभिमानाची आणि भाग्याची बाब असेल. कोणी कुठून लढायचं हा निर्णय पक्ष घेणार आहे. मुख्यमंत्री निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मतदारसंघांमध्ये अयोध्येचाही समावेश आहे,” अशी माहिती भाजपा आमदार वेदप्रकाश गुप्ता यांनी दिली आहे.

“ओवैसींच्या मदतीने योगी पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी उत्तर प्रदेश सोडून निघून जाईन”

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “जर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना अयोध्येतून लढायचं असेल तर आम्ही त्यांच्यासाठी प्रचार करु. भाजपा राज्यात सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल”.

काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची प्रतिक्रिया

योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेवर काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी प्रतिक्रिया दिली असून म्हटलं आहे की, “योगी आदित्यनाथ यांच्यासाठी आपला मतदारसंघ सोडण्याची तयारी असणाऱ्या आमदाराने गेल्या चार वर्षा तिथे काय कामं केली याची माहिती द्यायला हवी. किती लोकांनी रोजगार मिळाला? किती गावांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत आहे? महिलांविरोधात किती गुन्हे घडले? करोनामुळे प्रत्येक गावात किती मृत्यू झाले?”.

करोना हाताळणीसाठी उत्तर प्रदेश सरकारचे पंतप्रधानांकडून कौतुक!

“योगी आदित्यनाथ हेडलाइन मॅनेजमेंटचं काम करत आहेत. जर वेदप्रकाश गुप्ता यांनी मतदारसंघ सोडण्याऐवजी काम केलं तर जास्त बरं होईल,” अशी टीकाही राजपूत यांनी केली आहे.

समाजवादी पक्षाचे प्रवक्त्या जुही सिंग यांनी टीका करताना म्हटलं आहे की, “लोकांनी सध्याच्या सरकारमधील असंवेनशीलता पाहिली आहे. कायगा सुव्यवस्था ढासळत असून बेरोजगारी, शेतकऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. योगी आदित्यनाथ यांनी बलात्काराविरोधात ठाम भूमिका का घेतली नाही याचं उत्तर दिलं पाहिजे. निवडणूक कोणीही कुठूनही लढू शकतं. पण सरकारने ज्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत ती तशीच विचारली जातील”.