उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील नवविवाहित जोडप्यांना ‘शगुन’ म्हणून कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कुटुंबनियोजनाचा संदेश देण्यासाठी आणि कंडोम व गर्भनिरोधक गोळ्यांसारख्या संततीप्रतिबंधक साधनांविषयी जनजागृती करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता राज्याच्या विविध भागातील आशा स्वयंसेवकांतर्फे नवविवाहित जोडप्यांना ही अनोखी विवाहभेट देण्यात येईल.

कंडोमच्या पाकिटावरील छायाचित्रे कायद्याचे उल्लंघन करतात का; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा समावेश असलेल्या या किटमध्ये आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या एका पत्राचाही समावेश आहे. या पत्रातून नवविवाहित जोडप्यांना कुटुंबनियोजनाचे फायदे आणि दोन अपत्यांमध्ये किमान अंतर राखण्याचे फायदे सांगण्यात आले आहेत. सरकारच्या मिशन परिवार विकास योजनेतंर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला असून येत्या ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिनी या उपक्रमाचा शुभारंभ होईल. परिवार विकास योजनेचे प्रमुख अविनाश सक्सेना यांनी या उपक्रमाबाबत माहिती देताना म्हटले की, नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या वैवाहिक जबाबदारीची जाणीव करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी या जोडप्यांना ‘नयी पहल’ हे किट देण्यात येईल. या किटमध्ये कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या आणि जोडप्याच्या उपयोगाची इतर साधने असतील, अशी माहिती सक्सेना यांनी दिली. ज्या अशिक्षित जोडप्यांना या किटमध्ये देण्यात आलेल्या पत्रातील माहिती वाचता येत नसेल त्यांना ‘आशा’ स्वयंसेवकांकडून या सर्व गोष्टींच्या वापराबद्दल माहिती दिली जाईल. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार देशातील आशा स्वयंसेवक केवळ १२ टक्केच महिलांशी संवाद साधण्यात यशस्वी होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे देशातील नवविवाहित जोडप्यांशी आशा स्वयंसेवकांमार्फत जास्तीत जास्त संवाद साधण्याची गरज या सर्वेक्षणानंतर व्यक्त करण्यात आली होती.

गर्भनिरोधकांच्या जगात